शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ
किरकोळ कारणांवरून प्राणघातक हल्ले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : शहरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, घातक हत्यारे बाळगून टवाळखोरांनी शुक्रवारी (ता. ४) रात्री धुमाकूळ घातला. सिगरेटसाठी माचिस न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून थेट कोयता आणि चॉपरने हल्ला करणे, गाडी अडवून बिअरची बाटली डोक्यात फोडणे अन् कामावरून काढल्याचा राग धरून अख्ख्या कुटुंबावर लोखंडी गजाने तुटून पडणे, अशा तीन वेगवेगळ्या घटना अवघ्या काही तासांच्या अंतराने घडल्या. या घटनांमुळे भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
उपनगरमधील अप्पू चौकात शुक्रवारी रात्री आदर्श ठोके (वय ३२) आणि त्यांचा पुतण्या युवराज उभे असताना, संशयित बंटी उर्फ हेमंत काळे याने सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली. नाही, असे सांगताच संशयित बंटी, दर्शन जुन्नरे, अक्षय चावरिया, सुरज सुनसुना, भूषण वाबळे आणि सोहम यांनी ठोके यांना घेरले. संशयितांनी थेट चाकू, चॉपर आणि लोखंडी कोयत्याने आदर्श यांच्या छातीवर, पाठीवर आणि खांद्यावर प्राणघातक वार केले. मध्यस्थी करणाऱ्या पुतण्यावरही वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत सिडकोतील महाले फार्मजवळ शुक्रवारी रात्री प्रथमेष मथुरे (१९) व त्याचा मित्र साहिल केकाणे दुचाकीवरून जात असताना, मागून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी त्यांची गाडी अडवली. संशयितांनी धक्काबुक्की करत प्रथमेषच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केली, तर दुसऱ्याने पोटाला चाकू लावून धमकी दिली. या झटापटीत साहिलच्या गळ्यातील सोन्याची साखळी गायब झाली आहे. अंबड ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तिसऱ्या घटनेत नाशिक रोड येथील समतानगर आगार (टाकळी) येथे कामावरून काढून टाकल्याचा आकस मनात धरून कंत्राटदार जयकुमार चौहान (३८) व त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी संशयित बिजेंद्र प्रसाद, गोलुकुमार प्रसाद, रवींद्र प्रसाद, बलविंदर प्रसाद, मुकेश प्रसाद व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत जयकुमार आणि त्यांचा चुलत भाऊ विजय चौहान यांच्या डोक्यात लोखंडी गजाने जोरदार वार केले. मध्यस्थी करणाऱ्या संजय चौहान यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.