‘गौतमी गोदावरी’त साकारणार त्र्यंबकराजाची प्रतिकृती
सिंहस्थ कुंभमेळा : पर्यटन विकासासाठी १७.३४ कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन बहरणार आहे. गौतमी-गोदावरी धरण परिसरातील बेटावर आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकराजाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १७ कोटी ३४ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आगामी सिंहस्थात देश-विदेशातून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक व पर्यटक दाखल होतील. त्या पाश्र्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत असून, आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. या विकास प्रकल्पांतर्गत नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी गौतमी-गोदावरी धरण परिसरातील बेटाच्या विकासाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार श्री त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी नऊ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रतिकृती सभोवतालच्या परिसर विकासासाठी पाच कोटी ४१ लाख व परिसरात विजेच्या कामांसाठी एक कोटी ९४ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.
गौतमी-गोदावरी धरण परिसरातील विकासासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनूसार नियोजन करण्यात येत आहे. प्रकल्पासाठीच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या असून, लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
पर्यटकांसाठी सुविधा
सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे भाविक, पर्यटक आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध विकासकामांचे नियोजन करीत आहे. त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीमुळे परिसरातील धार्मिक व पर्यटन महत्त्वात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होताना हॉटेल, वाहतूक, स्थानिक बाजारपेठ आणि इतर पूरक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.