मेन फिचरच्या बातमीला
--
गणेशोत्सवाच्या तोंडावर
शहरात कचऱ्याचे ढीग
कचरा संकलन होईना; मक्तेदारावर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागांमध्ये नियमित कचरा संकलन होत नसल्याने रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे दुर्गंधी तसेच अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरातील विविध भागांत घंटागाड्या आणि ट्रॅक्टर नियमितपणे पोहोचत नसल्याने कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री अथवा योग्य आच्छादन नसल्यामुळे वाहतुकीदरम्यान कचरा रस्त्यावर पडत असल्याचेही निदर्शनास आले आहे. परिणामी मुख्य रस्त्यांसह परिसरात अस्वच्छता वाढून शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. शहरातील कचरा समस्या तातडीने दूर करण्यासाठी नियमित संकलन, योग्य विल्हेवाट आणि सुरक्षित वाहतूक याबाबत ठेकेदार कंपनीला सक्त सूचना देऊन कामात सुधारणा न झाल्यास कारवाई करावी, अशी मागणी महापौरांनी केली आहे.
बाजारपेठेत कचरा रस्त्यावर
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठा, मुख्य चौक आणि रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत असणे आवश्यक असताना नगरसेवक तसेच नागरिकांकडून कचऱ्याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.
चौकट
ट्रॅक्टरची संख्या कमी
यापूर्वी बीव्हीजी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी तसेच लेखी सूचना देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. कचरा संकलनासाठी आवश्यक ट्रॅक्टरची संख्याही कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम दैनंदिन स्वच्छतेवर होत असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.