‘ई-पॉस’विरोधात स्वस्त धान्य दुकानदारांचा बंद
---
पुरवठा विभाग : धान्य वितरण ठप्प; लाभार्थींचे हाल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : स्वस्त धान्य वितरण प्रणालींतर्गत ई-पॉस मशिनला येणाऱ्या तांत्रिक समस्यांकडे राज्याच्या पुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवारी (ता. ७) एकदिवसीय संप पुकारला. या बंद काळात धान्य वितरण ठप्प झाल्याने लाभार्थींचे हाल झाले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना महिन्याकाठी धान्य वितरण करण्यात येते. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून होणाऱ्या या धान्यवाटपासाठी ई-पॉस मशिनवर लाभार्थींच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात येतात. मात्र, मागील काही महिन्यांपासून या मशिनमध्ये तांत्रिक समस्या येत आहेत. परिणामी, वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग उभे ठाकत आहेत. त्यामुळे या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा केला. पण, त्यात अपेक्षित यश लाभत नव्हते.
ऑल महाराष्ट्र फेयर प्राइज शॉप डीलर्स फेडरेशनने ई-पॉस मशिनच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंदची हाक दिली होती. या ‘बंद’मध्ये नाशिकसह राज्यातील ९० टक्के स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. भविष्यातही अशीच एकजूट कायम राखण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, सचिव डी. एन. पाटील, तसेच बाबूराव म्हमाणे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना केले आहे.
‘ई-पॉस’च्या समस्या
- मशिन संथगतीने चालणे
- वारंवार सर्व्हर डाउन होणे
- नेटवर्कअभावी मशिन बंद पडणे
- मशिनवर लाभार्थींचा अंगठा न जुळणे
- लाभार्थींचा ओटीपी क्रमांक प्राप्त न होणे
पुरवठा विभाग नरमला
स्वस्त धान्य दुकानदारांच्या एकदिवसीय ‘बंद’पुढे राज्याचा पुरवठा विभाग नमल्याचे दिसून आले. पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत १५ सप्टेंबरला बैठकीसाठी पाचारण केले आहे. या बैठकीत ई-पॉसवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानदारांनी मंगळवार (ता. ८)पासून वितरण सुरू करावे, असे आवाहन फेडरेशनचे उपाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.