एसआयआरची दुसरी फेरी;
७.३४ लाख मतदारांना नोटिसा
सुनावणीसाठी १५ मतदारसंघांत ३४५ अधिकाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या (एसआयआर) दुसऱ्या टप्प्यात मतदार यादीतील संदिग्ध नोंदींची छाननी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ३४५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सुमारे ७ लाख ३४ हजार ६८५ मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एसआयआर मोहिमेचा पहिला टप्पा पार पडला असून, आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना २९ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच प्रारूप यादीतील माहिती अथवा नोंदींबाबत संदिग्धता असलेल्या मतदारांना नोटिसा देऊन त्यांची रीतसर सुनावणी घेतली जाणार आहे.
पंधराही विधानसभा मतदारसंघांतील सुनावणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ३४५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात सुनावणीसाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, संबंधित मतदाराला नोटिशीद्वारे सुनावणीचे ठिकाण, तारीख आणि वेळ कळविली जाणार आहे. यामुळे मतदारांचा वेळ वाचण्यासह सुनावणी प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.
सुनावणीसाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य
सुनावणीसाठी पाचारण करण्यात येणाऱ्या मतदारांना ओळख व संबंधित माहितीच्या पडताळणीसाठी १२ प्रकारची कागदपत्रे सादर करता येणार आहेत. यामध्ये आधारकार्ड, पारपत्र, निवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र तसेच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जात प्रमाणपत्रे व अन्य निर्धारित कागदपत्रांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.