धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 29077
धुळे : अवैध वाळू वाहतुकीतील विनानंबर प्लेटचा डंपर.
--
वाळूचा मालेगाव, मनमाड, नाशिकला पुरवठा
-
अवैध उपसा सुरूच : फागणे बायपास, कुसुंबा- चौगावमार्गे खुलेआम वाहतूक
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : जिल्ह्यात तस्करांकडून रोज बेसुमार अवैध उपसा केली जाणारी वाळू मालेगाव, मनमाड, नाशिकला जात आहे. तेथील तस्करांनी वाळूच्या बेकायदेशीर उपशासाठी धुळे जिल्ह्याला पसंती दिली आहे. त्यासाठी धुळे तालुक्यातील पांझरा नदी, शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी आणि शिंदखेडा, शिरपूर तालुक्यातील तापी नदीला लक्ष्य करण्यात आले आहे. यात तापी नदीच्या दुसऱ्या तिरावरील अमळनेर (जि. जळगाव) भागातूनही अवैध उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे शासकीय नियम धाब्यावर बसून आणि तीन यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आजही वाळूची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरूच आहे. त्यासाठी धुळे शहर आणि धुळे ग्रामीणमधील विविध मार्गांचा आधार तस्करांनी घेतला आहे.
-
राज्य शासनाने पावसाळ्यामुळे दहा जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत वाळू उत्खननाला बंदी घातली आहे. तरीही गेल्या तीन महिन्यांपासून अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या त्रस्त ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. ग्रामसभेतही वाळू तस्करीचा विषय मांडला गेल्यानंतर त्याची पद्धतशीरपणे अधिकाऱ्यांकडून बोळवण केली जाते. तक्रारीची निवेदने देऊनही त्यावर प्रतिसाद दिला जात नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी शेवटी नाशिक विभागीय महसूल आयुक्त आणि महसूलमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातून बेकायदेशीरपणे रोज सुमारे ४५ ते ५० लाख किमतीच्या वाळूची लूट होत असून ती धुळे जिल्ह्यांतर्गत आणि मालेगाव, मनमाड, नाशिकला पुरवठा केली जात आहे.
-
आरटीओ, पोलिस गप्प
बहुतांश विनानंबर प्लेटचे डंपर्स आणि एकाच नंबर प्लेटचे अनेक डंपर मालेगावहून येतात. त्यात धुळे जिल्ह्यातीलही असे डंपर्स सहभागी आहेत. तरीही त्याकडे आरटीओ, पोलिस यंत्रणा सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसते. पांझरा, बुराई, तापी नदीपात्रातून दिवसाढवळ्या आणि विशेषतः रात्री- अपरात्री मोठ्या संख्येतील ट्रक्टरव्दारे वाळूचा अवैध उपसा केला जातो. तेथून ते ट्रक्टर तस्करांकडून नियोजीत गाव शिवारात नेले जातात. तेथे डंपर्समध्ये वाळू भरली जाते. अशा पद्धतीने जिल्ह्यातून बेकायदेशीरपणे रोज १०० ते ११० डंपर्सची वाहतूक केली जाते. त्यानुसार रोज सुमारे ७५० ते ९५० ब्रास अवैध वाळूची वाहतूक केली जाते. यातून रोज सुमारे ४५ ते ५० लाख रूपयांची लूट होत असते.
-
वाळू वाहतुकीचा मार्ग
पांझरा, बुराई आणि तापी नदीपात्रामधील अवैध उपशातील वाळू ही नवलनगरमार्गे फागणे (ता. धुळे) बायपासने, तर चिमठाणे- शेवाडेमार्गे कुसुंबा- चौगावमार्गे मालेगाव, तेथून मनमाड, नाशिकला पाठवली जाते. तसेच यातील काही डंपर हे सोनगीर, नगावमार्गे देवपूरमधील जीटीपी स्टॉप परिसरातील कॉलन्यांमधून गोंदूर रोड, तेथून कुसुंबा- चौगावमार्गे मालेगावकडे नेले जातात. अवैध वाळू उपशासाठी न्याहळोद, कुसुंबा, नेर, आनंदखेडे (ता. धुळे) येथील पांझरा नदीपात्र, चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील बुराई नदीपात्र, अक्कडसे, बेटावद- मांडळ, वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्र, उपरपिंड (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्राचा वापर केला जात आहे. या ठिकाणी रोज दीडशे ते दोनशेहून अधिक ट्रक्टर गुंतलेले असतात. जिल्ह्यातून धुळे शहर आणि धुळे ग्रामीणमधून खुलेआम अवैध वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू असताना महसूल, आरटीओ, पोलिस यंत्रणा मूग गिळून गप्प कशी, असा त्रस्त ग्रामस्थांचा सवाल आहे. (क्रमशः)
-
१४-१
...चौकट...
१४-१
अवैध वाळूचा दर (टन)
* धुळे जिल्ह्यात १०००
* मालेगावसाठी १२००
* मनमाडसाठी १४००
* नाशिकसाठी १८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.