नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी खरिपावर ताण
पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन
नंदुरबार, ता. ९ : हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या नैऋत्य मॉन्सून हंगामात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, एल निनोच्या प्रभावामुळे खरिपात पावसाचे आगमन व वितरणात अनियमितता झाली असून, काही भागांत पावसाने ओढ दिल्याने खरिपावर ताण निर्माण झाला आहे. काही तालुक्यांत तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता पावसात खंड पडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
पिकांमध्ये आच्छादन करावे. कोळपणी करून पिकास मातीची भर द्यावी. बाष्पीभवन कमी करण्यासाठी पिकांच्या खालील भागातील पाने कमी करावीत आणि वाऱ्यावर आधारित आंतरपीकांचा वापर करावा. ठिबक अथवा तुषार सिंचनास प्राधान्य द्यावे. शेततळे व साठवण बंधाऱ्यातील संरक्षित पाणी सिंचनासाठी वापरावे. पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविण्यावर भर द्यावा.
पिकांवरील ताण नियंत्रण व आंतरमशागत करावी. पावसाचा ताण पडल्यास १ टक्का यूरिया, डीएपी अथवा १९.१९.१९ किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. लहान रोपाना सावली करावी. प्लास्टिक मल्चिंग व ठिबक सिंचनाचा वापर करावा तसेच नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा.
फळझाडांच्या बुंध्याभोवती गवत, पालापाचोळा टाकून आच्छादन करावे. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी केओलिन ८ टक्का किंवा पोटॅशियम नायट्रेटचे द्रावण फवारावे. १ टक्के बोडों मिश्रणाची फवारणी व खोडांना १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी. कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणी करावी. पक्षीघरे, चिकट सापळे व मित्र कीटकांचे संवर्धन करावे. हुमणी, शेंडी गोगलगाय व बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
..........
चौकट
शेतीचे नियोजन करावे
हवामान खात्यामार्फत पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जात आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजाची माहिती घेऊन नियोजन करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.