सेकंडमेन
---------------
फोर्टिफाइड तांदूळासह ७८.६३ लाखांचा साठा जप्त
----
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१० : अन्न व औषध प्रशासन कार्यालयास मिळालेल्या माहितीवरून ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान पाचोरा तालुक्यातील भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड, भवरखेड येथील मे. श्री महासर माता राईस मिलमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. तेथे फोर्टिफाइड तांदूळ आढळून आला. सहा अन्न नमुने घेतले असून, एकूण दोन लाख ९६ हजार ४७६ किलो तांदूळाचा ७८ लाख ६३ हजार १५० रुपयांचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला.
जप्त साठ्यात ६४ हजार ५४६ किलो फोर्टिफाइड राईस, एक लाख ३७ हजार ९९६ किलो ब्रोकन राईस, एक हजार ९९६ किलो प्लेन राईस (डोमेस्टिक पर्पज) विनालेबल, तीन हजार ४४६ किलो ब्रोकन राईस (डोमेस्टिक पर्पज) मिसब्रँडेड, ८१ हजार ४९६ किलो राईस एक्सपोर्ट, ६ हजार ९९६ किलो राईस (५ टक्के ब्रोकन) मलेशिया एक्सपोर्ट यांचा समावेश आहे. या आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणास याबाबत कळविण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला फोर्टीफाइड तांदूळ महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे किंवा कसे, याबाबत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून पुढील तपासणी करण्यात येत आहे.
तपासणीदरम्यान आस्थापनेत उंदराची विष्ठा, धूळ, कोळ्यांची जाळी व तांदूळ जमिनीवर साठवून ठेवणे, तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नमूद नसणे, खरेदीची बिले सादर न करणे आदी बाबी निदर्शनास आल्या. याअनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात आली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सहआयुक्त (अन्न), ठाणे विभाग एस. एस. जाधव, सहआयुक्त (अन्न) नाशिक विभाग मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे, अन्नसुरक्षा अधिकारी शरद म. पवार, आकाश बोऱ्हाडे, किशोर साळुंखे, योगराज सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात अथवा परिसरात अन्न भेसळीचा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर अथवा तक्रार पोर्टल https://complaints.mahafda.in वर तक्रार नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.