माजी सरपंचांचा प्रशासकीय कार्यकाळ संपला
जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायती विस्तार अधिकाऱ्यांकडे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : माजी सरपंचांना ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून देण्यात आलेली सहा महिन्यांची मुदत संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील तब्बल ६२१ ग्रामपंचायतींचा कारभार आता पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याने लोकप्रतिनिधींची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासनाने माजी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांना सहा महिन्यांसाठी कारभाराची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे मर्यादित अधिकाराअंतर्गत प्रशासक गावांचा कारभार पाहत होते.
दरम्यान, या प्रशासकांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा असताना शासनाकडून त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी, संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयालाही प्राप्त झाले असून, त्यानुसार पंचायत समित्यांतील विस्तार अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधींना संधी द्यावी
ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असला, तरी निवडणुका घेऊन लोकप्रतिनिधींना पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी सरपंच परिषदेकडून करण्यात आली आहे.
कोट
विस्तार अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र, निवडणुका घेऊन लोकप्रतिनिधींना संधी दिली पाहिजे.
- शिवा सुरासे, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.