फोटो : भोंदू बर्डे बाबा H29267
ABH26B03345
अभोणा : भोंदूबाबा व साथीदारांवर कारवाई करताना पोलिस.
....
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष;
अंधश्रद्धेतून ११ लाखांची फसवणूक
‘अंनिस’ने केला पर्दाफाश; पिंपळे खुर्दच्या भोंदू बर्डेबाबाला अटक
सकाळ वृत्तसेवा
अभोणा/नाशिक, ता. १० : पैशांचा १० पट परतावा देण्याचे आणि अघोरी पूजेद्वारे ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून निवृत्त महापालिका कर्मचाऱ्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची १० लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपळे खुर्द (ता. कळवण) येथील तथाकथित भोंदूबाबा हिराचंद शिवाजी बर्डे ऊर्फ राजूबाबाला अभोणा पोलिसांनी अटक केली असून, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बर्डेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध अभोणा पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार राजाराम सीताराम शेलार (वय ६५, रा. बोरीवली, मुंबई) हे मुंबई महापालिकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीतील सहकाऱ्यांमार्फत त्यांची पिंपळे खुर्द येथील भोंदू संजय बर्डे ऊर्फ हिराचंद बर्डे याच्याशी ओळख झाली. बाबाने शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांना सुरुवातीला एक हजार रुपयांचे दोन लाख रुपये करून दाखविण्याचे नाटक केले. त्यानंतर पाच लाख रुपये दिल्यास १५ कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले.
या आमिषाला बळी पडत शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल चार लाख २० हजार रुपये रोख आणि उर्वरित रक्कम ऑनलाइन स्वरूपात बाबा आणि त्याच्या साथीदारांच्या खात्यावर जमा केली. पूजेच्या वेळी अंधाऱ्या खोलीत नारळाचा अचानक स्फोट घडवून आणत पैशांचा पाऊस पडल्याचा भास निर्माण केला.
‘गोणीत’ निघाल्या रद्दी नोटा
पूजेनंतर बाबाने एक पैशांनी भरलेली गोणी शेलार यांच्या स्वाधीन केली व ‘सात दिवस ही गोणी उघडू नका, नाहीतर देवाचा कोप होईल,’ अशी भीती घातली. याचदरम्यान तक्रारादाराची काकू मृत झाल्याने त्यांनी गोणीची पूजा केली नाही. याबाबत त्यांनी भोंदूला सांगितले असता त्याने गोणी परत घेऊन येण्यास आणि स्मशानात पूजाविधी करण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली. या वेळी मात्र संशय आल्याने त्यांनी गोणी सोडून पाहिले असता, त्यात केवळ वर आणि खाली फक्त खरी ५०० ची नोट मात्र आतमध्ये खोट्या व खेळण्यातल्या रद्दी नोटा आढळल्या.
धमकी दिल्याने भांडाफोड
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेव्हा तक्रारदारांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा ‘पैसे मागितल्यास अघोरी विद्येने गायब करीन,’ अशी धमकी बाबाने दिली. या प्रकरणी राजाराम शेलार यांच्या तक्रारीवरून हिराचंद शिवाजी बर्डे, रामचंद्र बर्डे, विशाल पवार, सुमित्रा बर्डे, रवींद्र पवार, सोमनाथ बारामते आणि चिंतामण चौरे यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा व फसवणुकीचा गुन्हा अभोणा पोलिसांत दाखल करण्यात आला.
‘अंनिस’चे आवाहन
पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने अभोणा पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी भोंदू हिराचंद बर्डे यास अटक केली आहे. या भोंदूने अशाच प्रकारे कुणाला फसविले असेल तर त्यांनी अभोणा पोलिसांशी किंवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.