गणेशोत्सवात सामाजिक भाव आवश्यक
मंडळ पदाधिकाऱ्यांच्या भावना, भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १०ः लाडक्या गणरायाचे लवकरच आगमन होणार असून, वाजत गाजत स्वागत केले जाणार आहे. घराघरांमध्ये श्रींच्या स्वागताची ज्य्यत तयारी सुरु आहे. त्याप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाची तयारी सुरु आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंडळे सज्ज झाले आहेत. उत्सव काळात डीजेऐवजी पारंपारीक वाद्यांना प्राधान्य द्यावे, मर्यादित आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर व्हावा, अशी अपेक्षा विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
03713
पारंपरिक ढोल-ताशा, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आरोग्य, शिक्षण, रोजगार, कला-क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेणारा आनंददायी, शिस्तबद्ध, समाजोपयोगी गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प आहे.
- रोहित नाईक, अध्यक्ष, दत्तधाम चौक सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळ, सिडको.
03716
निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, याची खबरदारी घ्यायला हवी. लेझरलाइटवर कायमस्वरूपी बंदी घालावी. मंडळ यंदा २६ व्या वर्षात पदार्पण करत असून, ‘उत्सव… परंपरेचा, संस्कृतीचा… कुंभमेळा अन् गणेशोत्सवाचा!’ या संकल्पनेतून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
- प्रवीण मोरे, अध्यक्ष, राजे छत्रपती मित्र मंडळ, जुने सिडको.
17605
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक जनजागृतीचे माध्यम ठरावा, या उद्देशाने मंडळातर्फे यंदाही सामाजिक विषयावर जनजागृतीपर देखावा साकारले जातील. यंदाच्या देखाव्याचा विषय ‘बालकामगार : बालपणातील सुटलेली पाटी’ असा असून, प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा, हा संदेश आहे. डीजे, लेझरचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
- चंद्रकांत महानुभाव, अध्यक्ष, मातोश्री फ्रेंड सर्कल, नाशिकरोड.
17606
गणेशोत्सवात डीजेच्या वापराला मंडळाचा विरोध नाही; पण निर्धारित डेसिबल मर्यादेत आवाज असावा. मंडळाकडून गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. यंदा उत्सवाचा उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा सुरेख मेळ साधण्याचा प्रयत्न आहे.
- तुषार जोशी, अध्यक्ष, ओमकार मित्र मंडळ, नाशिक रोड.
00006
गेल्या १५ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती साकारली जाणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात श्रींचे आगमन होईल. डीजेला आमचा विरोध नाही; मात्र प्रशासनाने ठरवून दिलेल्या ध्वनीमर्यादेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे.
- सुदाम दुशिंग, अध्यक्ष, शिवमुद्रा फ्रेंड्स गणेशोत्सव मंडळ, आडगाव.
00005
गेल्या ३५ वर्षांपासून परिसरात भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते आहे. डीजे लावण्यास आमचा विरोध नाही; मात्र ध्वनीमर्यादेचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. नेपाळमधील पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी कोणताही देखावा किंवा अवास्तव खर्च न करता साधेपणा, सेवा आणि भक्तीला प्राधान्य देत उत्सव साजरा केला जाईल.
- आदित्य शेजवळ, अध्यक्ष, जय जनार्दन फाउंडेशन गणेशोत्सव मंडळ, आडगाव
10557
गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनीच साजरा व्हायला हवा. डीजेमुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो. दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर घेत सामाजिक जबाबदारी पार पाडली जाईल.
श्याम फर्नांडिस, अध्यक्ष, साई रुद्र बहुउद्देशीय संस्था, सातपूर
10556
उत्सव, मिरवणुका आनंदाने साजऱ्या करावी. मात्र डीजेचा कर्णकर्कश आवाज नागरिकांना त्रासदायक ठरू नये. ध्वनिप्रदूषणाची मर्यादा आणि वेळेचे नियम पाळणे आवश्यक आहे. मंडळातर्फे यंदा सुमारे १५ फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केली जाईल. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर केला जाणार आहे.
- नरेश सोनवणे, अध्यक्ष, राज्य कर्मचारी मित्र मंडळ, अशोकनगर, सातपूर
14431
सर्व मंडळानी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. सरदार चौक मित्र मंडळ २०१३ मध्ये डीजे मुक्त मंडळ म्हणून घोषित झाले आहे. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष सुमीत गुंडे असून, बालाजी मंदिर काल्पनिक देखावा सादर केला जाणार आहे.
- महेश महंकाळे, विश्वस्त, सरदार चौक मित्र मंडळ ट्रस्ट, पंचवटी.
14432
मोठ्या उत्साहाने सण साजरा करताना त्यास पारंपरिक जोड असावी. यावर्षी वणी गडावरील सप्तशृंगी माता देवीचा १३ फुटी देखावा सादर केला जाणार आहे. मंडळातर्फे विसर्जन मिरवणूकीत भाग घेण्याऐवजी या खर्चातून वर्षभर पंचवटी परिसरातील नागरिकांसाठी तीन रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध केल्या जातात.
- अशोक मुर्तडक, अध्यक्ष, कैलास मित्र मंडळ, पंचवटी
(फोटो येणार आहे)
मंडळातर्फे यावर्षी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. इतर मंडळानी ही पारंपरिक वाद्याचा वापर करावा. मंडळातर्फे संजीवनी बुटी आणतानाचा हनुमानाचा देखावा सादर केला आहे. मिरवणूक खर्चाहून अन्नदानासह इतर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
- विशाल देशमुख, अध्यक्ष, मालेगाव स्टँड मित्र मंडळ, पंचवटी.
14434
पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. डीजे असल्यास मर्यादित आवाजात असावा. मंडळातर्फे यावर्षी रावणाचे गर्व हरण पौराणिक देखावा सादर केला जाणार आहे.
- गुलाब भोये, संस्थापक अध्यक्ष, गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला, क्रीडा मंडळ ट्रस्ट, पंचवटी.
14720
१९६० पासून भद्रकालीचा राजा मंडळाच्या गणेशाची ओळख आहे. सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन केलेल्या नियमांचे पालन करूनच डीजे वाजवण्यात यावा. यंदा सिंधुरेश्वर गणरायाचे दर्शन भाविकांना घडविण्यात येणार आहे.
- नीलेश शेलार, अध्यक्ष नटराज बंधू मित्र मंडळ, भद्रकाली
14717
मंडळास ८४ वर्ष पूर्ण झाले आहे. स्थापनेपासून जिवंत देखाव्यची परंपरा कायम ठेवली आहे. या वर्षी मंडळाचा रामायणातील धार्मिक जिवंत देखव्यातून समाजसुधारणेची शिकवण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंडळ नेहमी पारंपरिक वाद्यला महत्व देते. सोबत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून संस्कृती जोपासणेला प्राधान्य देत आहोत.
पराग सिन्नरकर, अध्यक्ष वेलकम सहकार्य मित्र मंडळ
14719
गेल्या २२ वर्षांपासून मंडळ समाज प्रबोधनावर देखावे सादर करण्यात आले आहे. यंदा सिंहस्थ कुंभमेळ्यातील सेवा आणि संस्कृती याचे महत्त्व सांगणारे जिवंत देखावेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि नियमांचे पालन करूनच डीजेचा वापर करावा.
गणेश बर्वे, अध्यक्ष श्री राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ
14718
मंडळाचे यंदाचे ६० वे वर्षे आहे. डीजे आवश्यकतेनुसार नियमांच्या अधिन राहून वापर केल्यास हरकत नाही. यंदा मंडळातर्फे अमली पदार्थ विरोधी मोहीम जनजागृतीसह त्यापासून दूर राहावे असे आवाहन करणारा देखावा असेल.
रामसिंग बावरी, अध्यक्ष शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ
14722
नाशिकचा महाराजा म्हणून मंडळाच्या गणपतीची ओळख आहे. मंडळाचे हे २१ वे वर्ष आहे. यंदा जयपुर पॅलेसचा देखावा सादर केला जात आहे. मंडळ नेहमी पारंपारिक वाद्यांचा वापर करत आला आहे. यापुढेही त्याचाच वापर केला जाणार आहे. डीजेवर बंदी असावी.
- स्वप्निल पाटील, अध्यक्ष राजमुद्रा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ कॉलेज रोड
14723
मंडळाचे यंदा ३३ वे वर्ष आहे. मंडळ यंदा ब्रह्मांड दर्शन देखावा सादर करण्यात येत आहे. मंडळाकडून नेहमीच पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला आहे. मंडळ डीजेचा वापर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करत केला जाईल.
विनोद येवले, अध्यक्ष येवलेकर जय बजरंग सामाजिक संस्था कॉलेज रोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.