मस्ट
पालिकेसाठी दहा कोटींचा निधी मंजूर!
चंद्रकांत रघुवंशींची नंदुरबारला मागणी; एकनाथ शिंदेंची लंडनहून घोषणा
नंदुरबार, ता. १० : शहर विकासकामांसाठी पालिकेला निधी मिळावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे गुरुवारी (ता. १०) केली. या वेळी सामंत यांनी कोणताही विलंब न करता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत निधीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर लंडन दौऱ्यावर असलेल्या शिंदेंनी नंदुरबारच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेत दहा कोटींचा निधी तत्काळ मंजूर केला.
शहरातील रस्त्यांची सुधारणा तसेच विविध विकासकामांसाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री शिंदे परदेश दौऱ्यावर असतानाही तातडीने निर्णय झाल्याने आमदार रघुवंशी यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
उद्योगमंत्री सामंत यांनी आमदार रघुवंशी यांच्या मागणीची त्वरित दखल घेत थेट उपमुख्यमंत्र्यांकडून काही तासांतच निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे आगामी विकासकामांना गती मिळणार आहे. निधी मिळाल्याने आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, महिला बालकल्याण समिती शीतल वसावे, शिक्षण समिती सभापती भावना गुरव, आरोग्य सभापती प्रीतम दंडोरे यांनी उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांचे आभार मानले.