NSK26H29322
नंदुरबार : साहित्यिकांच्या आढावा बैठकीत बोलताना उदय सामंत.
---
नंदुरबारसह ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय
---
मराठी भाषामंत्री उदय सामंत यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १० : मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किमान ५०० चौरसफुटांची जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिले.
येथील बिरसा मुंडा सभागृहात साहित्यिकांसमवेत झालेल्या संवाद व आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, मराठी भाषा विभागाचे भाषा संचालक डॉ. अरुण गिते, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाषा, अहिराणी तसेच स्थानिक बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील. यासाठी मराठी भाषा अधिकारी समन्वयक म्हणून काम करेल. जिल्ह्यातील लेखकांचे प्रकाशित साहित्य शासन खरेदी करणार आहे. यामुळे नंदुरबारमधील लेखकांनी लिहिलेले साहित्य जिल्ह्यातील वाचक आणि ग्रंथालयांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
चौकट
वाहरू सोनवणेंच्या गावाला ‘पुस्तकांचे आणि कवितांचे गाव’ करणार
ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या श्रीखेडा गावाला ‘पुस्तकांचे आणि कवितांचे गाव’ करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच आदिवासी साहित्य, बोलीभाषा आणि मौखिक साहित्य परंपरेला मुख्य प्रवाहातील मराठी साहित्याशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्यिकांनी नंदुरबार हा विविध मराठी बोलीभाषांनी समृद्ध असलेला आदिवासीबहुल जिल्हा आहे. अभिजात मराठी भाषा अधिक समृद्ध करायची असेल, तर नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमधील बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे. त्यासाठी बोलीभाषा संवर्धन केंद्र उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.