लोगो : चक्रधर स्वामी अवतार दिन विशेष
फोटो : H29336
---
चक्रधर स्वामींच्या पाऊलखुणांनी व्यापला नाशिकचा भूगोल
शासकीय यादीत ५७ तीर्थस्थळांची नोंद; पंचवटीपासून त्र्यंबक-अंजनेरीपर्यंत स्वामींच्या वास्तव्य खुणा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या भ्रमणाचा नाशिक जिल्ह्याशी असलेला संबंध केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून, त्याला स्थानपरंपरा, प्राचीन स्थळे आणि महसुली नोंदींचाही आधार मिळत असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थस्थळांची सुरक्षा, संवर्धन व विकासासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या यादीत तब्बल ५७ स्थळांची नोंद करण्यात आली आहे. या यादीत त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, नाशिक शहर, निफाड आणि सिन्नर तालुक्यांतील स्थळांचा समावेश आहे.
चक्रधर स्वामींच्या नाशिक भ्रमणाच्या संदर्भामुळे या यादीचे ऐतिहासिक महत्त्व अधिक ठळक होते. ‘स्थानपोथी’च्या संदर्भानुसार चक्रधर स्वामी नाशिकमध्ये पंचवटी येथे वास्तव्यास होते. या काळात रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य आणि कपालेश्वर या स्थळांना त्यांनी भेटी दिल्याचे उल्लेख आहेत. त्यानंतर त्यांचा प्रवास गोवर्धन, त्र्यंबक आणि अंजनेरीकडे झाला आणि पुन्हा नाशिकला परतल्यानंतर तेथून बीडच्या दिशेने ते निघाले, असा उल्लेख उपलब्ध आहे. चक्रधर स्वामींच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा शके ११८९, अर्थात इ. स. १२६७ आहे. सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने मेहकर येथील बाणेश्वर मंदिरातील बोणेबाई यांच्यासोबत ते त्र्यंबकेश्वरकडे निघाले होते. मात्र वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरला जाण्याचा निर्णय बदलला आणि तेथे विधिवत संन्यासदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांची व्यापक भारतभ्रमंती सुरू झाली. याच भ्रमणकाळानंतर नाशिक- त्र्यंबकेश्वर परिसराशी त्यांचा संबंध अधिक दृढ झाल्याचे महानुभाव परंपरेतील संदर्भ सांगतात. नाशिक जिल्ह्यातील सर्वांत ठोस कालसंदर्भ शके ११९२, अर्थात इ.स. १२७० चा आहे. वैशाख शुद्ध पंचमी, शके ११९२ रोजी चक्रधर स्वामी अंजनेरी येथे आले आणि त्यांचे वास्तव्य झाले, असा उल्लेख ‘महानुभावीय बृहत् कालनिर्णय’च्या संदर्भाने प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, स्वामी ज्या ठिकाणी थांबले ते अंजनेरीतील प्राचीन हेमाडपंती मंदिर असल्याचा उल्लेख आहे. नंतर त्या ठिकाणी ओटा बांधण्यात आला आणि दत्तमहाराजांची मूर्तीही स्थापन करण्यात आली. चक्रधर स्वामींचा अंजनेरीशी विशेष संबंध असल्याचे सांगितले जाते आणि या प्राचीन मंदिरात त्यांचे दोन वेळा वास्तव्य झाल्याचा संदर्भही उपलब्ध आहे.
---
त्र्यंबकेश्वरातील १६ स्थळे
जिल्हा प्रशासनाच्या यादीकडे पाहिले तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर किल्ला, ब्रह्मगिरी परिसर, विविध आसनस्थाने, चरणस्थाने, गुंफा, गौतमाळा, कुशावर्त परिसर, गंगासागर परिसर आणि अंजनेरीतील स्थळे अशी मोठी मालिका दिसते. यातील अनेक स्थळे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या जमिनीवर असून काहींची नोंद वर्ग-१ किंवा वर्ग-२ स्वरूपात आहे. नाशिक शहरातील नोंदी आणखी वेगळा धागा दाखवतात. पंचवटी परिसरातील आसनस्थाने, डोहाजवळील स्थान, जलसेन, पंचायतन, साळातीर्थ, कपालेश्वर परिसरातील गुंफा क्रमांक १, २ व ३, चौकी आसन, अवस्थान स्थान आणि काळाराम मंदिर परिसरातील स्थळे अशा नोंदी आहेत.
---
निफाड-सिन्नरपर्यंत ठेवा
निफाड तालुक्यात दत्तमंदिर, कोकणाई स्थान, विहरण स्थान, आसन स्थान, चक्रधर स्वामी दत्त मंदिर, विडा वाहणे स्थान, वस्ती स्थान आदींची नोंद आहे. सिन्नर तालुक्यात दत्त मंदिर, अडकित्ते बाबा मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, वटेश्वर मंदिर, पद्म आसन, गादेश्वर महादेव मंदिर, वैजनाथ मंदिर, पट्टीशाळा मंदिर, अवेश्वर मंदिर आणि श्रीकृष्णनाथ मंदिर आदी स्थळे यादीत आहेत.
---
५७ स्थळांची यादी...
त्र्यंबकेश्वर : ब्रह्मगिरी, मेटघर, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी परिसरातील स्थळे
नाशिक : : पंचवटी, कपालेश्वर, काळाराम मंदिर परिसरासह विविध स्थानपरंपरा
निफाड : महानुभाव मंदिरे, आसन, विहरण, वस्ती व अन्य स्थळे
सिन्नर : दत्तमंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, आसन व अन्य धार्मिक स्थळे
एकूण नोंदी : ५७
--- कोट
बाराव्या शतकात महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र पुनीत झाला, ८०० वर्षांपूर्वी १६५० तीर्थस्थाने निर्माण झाली. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्य विश्वात या प्राचीन तीर्थस्थानांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज महाराष्ट्र शासन ''प्राचीन महानुभावीय तीर्थस्थानांचे जतन, सुरक्षा, संवर्धन आणि विकासासाठी धोरण आखले आहे.
-हरिहर पांडे, नागपूर,
समन्वयक, महानुभाव स्थान माहात्म्य अभियान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.