एन्कर
यंदा गणराया १२ दिवसांसाठी मुक्कामी; नऊ वर्षांनी योग
हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी; तिथीच्या गणितामुळे उपवास सोडण्याबाबत संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : यंदाचा गणेशोत्सव धार्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर यंदा गणरायाचा मुक्काम १२ दिवसांचा राहणार असून, त्याचबरोबर हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत. तिथीच्या विशिष्ट गणितामुळे दोन्ही व्रतांचा योग एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे हरितालिका पूजन कधी करायचे, गणेशाची स्थापना कोणत्या वेळी करायची आणि उपवास कधी सोडायचा, याबाबत भाविकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पंचांगानुसार १४ सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असून सकाळी ७.०७ वाजता तृतीया समाप्त होते. हरितालिका तृतीया व्रतासाठी सूर्योदय व्यापिनी तृतीया आवश्यक मानली जाते. दुसरीकडे गणेश चतुर्थीच्या व्रतासाठी चतुर्थी तिथीचा मध्यान्ह काळाशी संबंध महत्त्वाचा असतो. यंदा सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि मध्यान्ह काळात चतुर्थी असल्यामुळे दोन्ही व्रते एकाच दिवशी आली आहेत. त्यामुळे हरितालिका आणि गणेश चतुर्थी यांच्यातील हा योग तिथीच्या नियमांनुसार घडला आहे.
बारा दिवसांच्या गणरायाच्या मुक्कामाचा योग तब्बल नऊ वर्षांनंतर आला आहे, याआधी २००६ आणि २००९ मध्ये हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हा योग आला आहे. तसेच यापूर्वी २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव झाला होता. यंदाही तिथीच्या अधिक दिवसांच्या गणितामुळे गणरायाचा मुक्काम १२ दिवसांचा होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील हा दुर्मीळ तिथीयोग, १२ दिवसांचा मुक्काम आणि त्यात येणारे गौरीपूजन यामुळे भाविकांसाठी धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे पर्व ठरणार आहे.
---
सकाळी हरितालिका, त्यानंतर गणरायाची स्थापना
१४ सप्टेंबरला हरितालिका पूजनासाठी सकाळचा कालावधी महत्त्वाचा राहणार आहे. उपलब्ध पंचांग माहितीनुसार सकाळी ६.२२ ते ७.०६ हा हरितालिका पूजनाचा शुभकाळ देण्यात आला आहे. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेश स्थापनेसाठी सकाळी ११.२० ते दुपारी १.४४ हा मुख्य मुहूर्त आहे. मात्र तृतीया समाप्त होण्यापूर्वी किंवा त्यानंतरच हरितालिका पूजन करावे, अथवा ७.०७ वाजल्यानंतरच गणेशपूजन सुरू करावे, असा सक्तीचा नियम नसल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ या कालावधीत सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना व पूजन करता येईल. त्यासाठी भद्रा अथवा विशिष्ट कुयोग टाळण्यासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची आवश्यकता नाही.
--
उपवास कधी सोडायचा?
हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने उपवासाच्या पद्धतीबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी आपली पारंपरिक व्रतपद्धती व कुटुंबाची परंपरा लक्षात घेणे अपेक्षित आहे. गणेशोत्सवातील उपवास करणाऱ्या भाविकांनी मात्र १५ सप्टेंबर रोजी उत्तरपूजेनंतर श्रीगणेशाला नैवेद्य दाखवून त्यानंतर तीर्थ अथवा पाणी घेऊन उपवास सोडावा.
---
गौरी आगमन १७ सप्टेंबरला
गणेशोत्सवातील महत्त्वाचा भाग असलेल्या गौरीपूजनाचेही वेळापत्रक निश्चित झाले आहे. १७ सप्टेंबरला गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७.५४ वाजेपर्यंत गौरी आवाहन करता येईल. १८ सप्टेंबरला शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असल्याने नेहमीच्या पद्धतीने गौरीपूजन करावे. त्यानंतर १९ सप्टेंबरला शनिवारी मूळ नक्षत्रावर दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करता येईल.
---कोट
तिथी सूर्योदय किंवा मध्यान्ह व्यापते हा नियम मुख्यतः व्रताची दिननिश्चिती करण्यासाठी असतो. त्यामुळे एखादी पूजा तिथी संपण्याच्या किंवा सुरू होण्याच्या क्षणालाच करणे बंधनकारक नाही. हरितालिका पूजन, गणेश स्थापना आणि उपवास सोडणे या तिन्ही गोष्टींचा क्रम वेगळा समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही व्रतांचे कर्ते वेगवेगळे असल्याने एका पूजेचा कालावधी दुसऱ्या पूजेसाठी अडथळा ठरत नाही.
-गणेश बुवा, ज्योतिषाचार्य
---
महत्त्वाच्या तारखा
तारीख धार्मिक विधी वेळ
१४ सप्टेंबर हरितालिका पूजन सकाळी ६.२२ ते ७.०६
१४ सप्टेंबर गणेश स्थापना सकाळी ११.२० ते दुपारी १.४४
१५ सप्टेंबर उत्तरपूजा व उपवास सोडणे उत्तरपूजेनंतर
१७ सप्टेंबर गौरी आवाहन सायं. ७.५४ पर्यंत
१८ सप्टेंबर गौरीपूजन ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही
१९ सप्टेंबर गौरी विसर्जन दिवसभर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.