फोटो : H29371
नाशिक : कुंभथॉनतर्फे आयोजित स्प्रिंटमध्ये उपस्थित तज्ज्ञ मार्गदर्शक.
---
कुंभमेळ्याच्या आव्हानांवर ‘स्प्रिंट’मधून उपाययोजना
तंत्रज्ञ, संशोधक, स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांसाठी कुंभथॉनतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : आगामी सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुकर, शाश्वत आणि तंत्रज्ञानसक्षम करण्याच्या उद्देशाने कुंभथॉनने पुढाकार घेतला. या वेळी ‘स्प्रिंट’ या तिसऱ्या स्टार्टअप फेस्टिव्हलचे आयोजन नुकतेच सिटी सेंटर मॉल येथील ग्रँड बॉलरूममध्ये केले होते.
कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनातील प्रत्यक्ष आव्हानांवर जलद, व्यवहार्य आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील, असे उपाय विकसित करण्यासाठी या उपक्रमात तंत्रज्ञ, नवोन्मेषक, उद्योग प्रतिनिधी, स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि तज्ज्ञ एकत्र आले होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, एमआयटी बॉस्टन आणि प्रोजेक्ट नंदा द इंटरनेट ऑफ एजंटचे संस्थापक प्रा. डॉ. रमेश रासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इनोव्हेशन इंक्युबेशन ॲण्ड आंत्र्यप्रेन्युअरशिपचे संचालक प्रा. डॉ. देविदास गोल्हार पीडब्ल्यूसी इंडियाचे पार्टनर सुभाष पाटील, विनजीत टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अश्विन कंडोई यांनी मार्गदर्शन केले. तसेच एचडीएफसी क्रेडीला फायनान्शिअल सर्विसेसचे सहसंस्थापक अजय बोहरा, सी डॅकचे कार्यकारी संचालक आदित्य कुमार सिन्हा, टीसीएसचे प्रमुख शास्त्रज्ञ सौविक बारात हे मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. उपक्रमात तिनशे विद्यार्थी आणि २८ स्टार्टअप यांनी सहभाग घेतला. ‘कुंभमेळ्याच्या आव्हानांमधून भविष्यातील भारतासाठी उपाय निर्माण करणे’, हा स्प्रिंटचा उद्देश आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ च्या व्यापक प्रमाणातील व्यवस्थापनासाठी एकात्मिक, सुरक्षित आणि अखंड डिजिटल परिसंस्था उभारण्याचा तंत्रज्ञान आराखडा या सादरीकरणातून मांडला. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल ट्विन, जीआयएस, माहितीचे तात्काळ विश्लेषण, विविध डिजिटल सेवा आणि एकात्मिक कमांड सेंटरच्या माध्यमातून गर्दी, वाहतूक, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता व भाविकांचा अनुभव अधिक प्रभावी करण्यावर भर दिला. सार्वजनिक व खासगी ४जी/५जी नेटवर्क, मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन आणि उपग्रहाधारित पर्यायी व्यवस्था यांद्वारे प्रत्येक भाविकाला अखंड डिजिटल जोडणी मिळावी आणि आपत्कालीन परिस्थितीतही संवादव्यवस्था कार्यरत राहावी, हा या आराखड्याचा महत्त्वाचा उद्देश होता.