(टुडे पान एक ॲंकर)
फोटो : NSK26H29424 वाहरू सोनवणे (पासपोर्ट)
फोटो : NSK26H29423
नंदुरबार : ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात करताना.
------------------------
कवितेच्या गावाला आदिवासी साहित्य, संस्कृती सन्मानाचे केंद्र बनवावे
शासनाच्या उपक्रमाबाबत ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणेंची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १२ : जिल्ह्यातील श्रीखेड गावाला ‘कवितेचे गाव’ आणि ‘पुस्तकांचे गाव’ बनविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आदिवासी जिल्ह्यातील साहित्य विश्वाचा हा गौरवच म्हणावा लागेल. मात्र, ही संकल्पना राबवितांना आदिवासी साहित्य आणि संस्कृतीचा सन्मान राखला जाईल, याची पुरेपुर काळजी घेतली गेली पाहीजे. आदिवासींच्या लिखीत साहित्यासोबतच बोलीभाषेतील आणि मौखीक साहित्यिकाचे संवर्धन होण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न झाले पाहीजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलतांना व्यक्त केली.
वाहरू सोनवणे यांचे जन्मगाव असलेल्या श्रीखेड (ता. शहादा) गावाला ‘कवितेचे आणि ‘पुस्तकांचे गाव’ बनविण्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी नंदुरबारमध्ये केली. शासनाच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील साहित्यिकांनी स्वागत केले आहे. वाहरू सोनवणे म्हणाले, माझ्या मातीतील संघर्ष आणि आदिवासी संस्कृतीच्या कवितांना मिळालेला सन्मान आहे, असे मी मानतो. बऱ्याचदा गाजावाजा करून घोषणा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होतच नाही. श्रीखेडच्या बाबतीत असे घडणार नाही, अशी आशा आहे. शासनाची संकल्पना काय आहे आणि हा प्रकल्प कशा स्वरूपाचा राबविला जाणार आहे, याची मला अद्याप कोणतीही कल्पना नाही. मात्र, या उपक्रमातून आदिवासी साहित्य, बोलीभाषा आणि निसर्गाशी जोडलेल्या कवितांना जागतिक व्यासपीठ मिळावे. दुर्गम भागातील आदिवासी साहित्य जगाच्या नकाशावर पोहचावे. आदिवासी बोलीभाषा, भिलोरी संस्कृती आणि दुर्गम भागातील आदिवासी साहित्यिकांना साहित्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी, ही अपेक्षा श्री. सोनवणे यांनी व्यक्त केली.
------
साहित्यिकांचा सन्मान राखला जावा
आदिवासी साहित्याचा गौरव करण्यासाठी शासन श्रीखेडमध्ये हा उपक्रम हाती घेत असल्याचा आनंदच आहे. मात्र, आदिवासी साहित्य आणि साहित्यिकांचा सन्मानही राखला गेला पाहीजे, अशी अपेक्षा आहे. याबाबत प्रशासनाने अद्याप आमच्याशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. एक दिवस आधी फोनद्वारे निरोप मिळाल्याने मला बैठकीला उपस्थित राहता आले नाही. या उपक्रमाची नेमकी संकल्पना काय राहणार आहे, ते कळायला हवे, असेही वाहरू सोनवणे म्हणाले.
---------------
वाहरूभाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षण- संवर्धनासाठी खर्ची घातले आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाचाच हा गौरव म्हणावा लागेल. त्यांच्या मुळ गावी सुरू होणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्या ‘स्टेज’ कवितेला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. नवसाहित्यीक, कवींना यातून प्रेरणा मिळेल.
- भिमसिंग वळवी, मुख्य संयोजक, आदिवासी मौखीक साहित्य परिषद