लोगो :
घटनाचक्र
लेखक : अभय सुपेकर
विकासाकामांत गुणवत्ता महत्त्वाची
सिंहस्थ- कुंभमेळ्यानिमित्त होणारी विकासकामे संस्मरणीय आणि दीर्घकालीन ठरावीत, यासाठी प्रशासनाकडून त्याची गुणवत्ता तपासली जाते. तथापि, एवढ्यावरच न थांबता कठोर, ठोस भूमिका आणि वेळीच खबरदारी व उपाययोजना यांचा अवलंबही तितकाच महत्त्वाचा आहे.
- अभय सुपेकर
-------------
आ तापासून दीड-पावणेदोन महिन्यांत २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण होणार आहे. त्याच्या तयारीला प्रशासकीय पातळीवर सुरुवात झाली. आठ-दहा दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याची झलक दाखविणारा कार्यक्रमही पार पडला. नाशिक शहरातील २८ वर रस्त्यांच्या कामांना गती आली. शेकडो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होत आहेत. दोनेक महिन्यांपूर्वी सलग झालेल्या पावसाच्या रिपरिपीने नाशिककरांची दैना उडाली होती. खड्डेमय रस्त्यांनी अनेकांना जखमी केले; काहींचे कंबरडे, तर काहींचे हात-पाय मोडले. दहा-बारा नागरिकांना जीवालाही मुकावे लागले. महापालिकेची महासभाही खड्ड्यांमुळे नाशिककरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे लक्ष वेधणारी ठरली. गेल्या काही दिवसांत पावसाने पाठ फिरवली आहे. रस्त्यांच्या कामांच्या पूर्ततेलाही वेग आला. रस्त्यांची कामे फेब्रुवारी-मार्च २०२७ पर्यंत चालतील, अशी अटकळ आहे. पावसाने फिरवलेली पाठ आणि खड्ड्यांची झालेली मलमपट्टी यामुळे खड्ड्यांविषयीची ओरड कमी झाली. त्यातच नाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कामाच्या गुणवत्तेची ग्वाही देत असतानाच, ‘कामात खोट दाखवा, नाव बदलेन’ अशा शब्दांत आव्हान देत आपल्या कारभाराला चोखपणाची किनार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिंहस्थानिमित्त नाशिक शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांशिवाय रामकालपथ, गोदावरी नदीची स्वच्छता, सुशोभीकरण, गोदाघाटांची डागडुजी व विस्तारीकरण, मंदिरांची डागडुजी, रंगसफेदी यांच्यापासून ते साधुग्रामची उभारणी आणि तेथील मूलभूत व पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रेल्वेस्थानक, विमानतळांचे विस्तारीकरण व क्षमतावृद्धी अशा कितीतरी कामांवर हजारो कोटी रुपये खर्च होताहेत. खऱ्या अर्थाने नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरवासीयांसाठी ही सिंहस्थाबरोबरच विकासकामांची पर्वणीही ठरत आहे. आता समृद्धी महामार्गाला नाशिक, सिन्नर आणि परिसरातील गावे जोडण्यासाठी बोरखिंड येथे इंटरचेंजही होणार आहे. त्यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, विस्तारीकरण होत असून, रिंगरोडचा मुद्दा गाजतो आहे. त्याला विरोधाची किनार असली, तरी अडखळत का होईना, त्यावर तोडगा निघेल आणि तोही प्रत्यक्षात येईल, अशी प्रशासनाची अटकळ आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीकडे आणि त्याच्या विकासकामांकडे पाहत असताना ती वेळेआधी कशी पूर्ण होतील, त्याचा येणाऱ्या भाविक, पर्यटकांसह नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरवासीयांना अधिकाधिक दीर्घकालीन फायदा कसा होईल, याकडे लक्ष देणे, त्यासाठी सर्वांनीच आग्रही राहणे गरजेचे आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी एकुणात विकासकामांची ब्ल्यूप्रिंट प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी परिसरातील जिल्ह्यांसह लगतच्या गुजरातेतील जिल्ह्यांच्या प्रमुखांशीही संपर्क, समन्वय वाढविला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व जिल्हा पोलिसप्रमुख स्वामी यांनीही आराखडे आखले आहेत.
प्रशासनाच्या पातळीवर सिंहस्थाच्या विकासकामांना त्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. विकासकामांना सुरुवात करण्याचा मुहूर्त लांबला, तरीही कामे मार्च-एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करायचीच, हा प्रशासनाचा निर्धार कौतुकाचा आहे. मात्र, त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही स्वरूपाची तडजोड होता कामा नये, ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे, हेही लक्षात घ्यावे. रस्त्यांच्या कामाबाबत सुरुवातीला ओरड झाली. काही रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करताना त्यात खोट आढळल्यावर दंडाचा बडगा उगारला गेला. त्रिस्तरीय तपासणीची यंत्रणा असतानाही त्याला गुंगारा देण्याचा प्रयत्न झाला होता. आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली, त्याचे स्वागत आहे. तथापि, केवळ गर्जना न करता सातत्यपूर्ण कृतिशीलतेतून गुणवत्तेबाबत आग्रही राहिले पाहिजे. कामकाजात पारदर्शक, व्यवहारात सचोटी, गुणवत्तेपूर्ण कामासाठी वरचेवर कामकाजाचे ऑडिट, ठेकेदारांकडे त्यासाठी पाठपुरावा, तपासणी यंत्रणेला डोळ्यांत तेल घालून त्याचे दायित्व निभावण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आतापर्यंत जी विकासकामे झाली आहेत, त्यांचीही ज्याप्रमाणे आयआयटीच्या तज्ज्ञांकडून मूल्यमापन करून घेतले, तशाच प्रकारे सिंहस्थानिमित्त होत असलेल्या कामांचे मूल्यमापन, गुणवत्तानिर्धारण करून घेतले पाहिजे. कारण, सिंहस्थ काही महिन्यांमध्ये पार पडेल; पण हजारो कोटी रुपये खर्चून केलेली कामे नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरवासीयांना अनेक दशके सेवा देत राहिली पाहिजेत. त्यातून या भागाचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. या विकासकामांनी शहरांच्या सौंदर्यात भर आणि नागरिकांना मिळणाऱ्या भौतिक आणि पायाभूत सुविधांचा दर्जा व गुणवत्ता विस्तारली पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे. गोदावरी नदी खळाळत वाहणे, तिचे पाणी शुद्ध आणि त्याचा दर्जा उत्तमोत्तम राखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने वर्षानुवर्षे कार्यरत राहण्याची केलेली व्यवस्था चोख राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच प्रशासनाने गुणवत्तेचे दावे प्रत्यक्षात राखण्यासाठी कृतिशीलतेवर भर दिला पाहिजे.
चौकट
उत्सव गणरायाचा, ध्यास सिंहस्थाचा!
येत्या सोमवारी (ता. १४) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज होत असतानाच, यंदाच्या उत्सवात सिंहस्थाचीही झलक पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवातील देखावे, स्पर्धा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंहस्थाची तयारी, त्याची भव्यता आणि नाशिकचे त्याच्याशी असलेले नाते अधोरेखित केले जाईल. शांतता, शिस्त आणि विधायकतेत उत्सव साजरा करण्याची नाशिककरांची परंपरा आहे. त्यामुळे ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाच्या आगमनाचा दिमाख वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसरीकडे, ‘डीजे’चा दणदणाट आणि लेझर दिव्यांमुळे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत सातत्याने चर्चा होत आहे. या दोन्हींबाबत समाजातही संवेदनशीलता वाढताना दिसते. उत्सवाचा उत्साह कायम ठेवत, परिस्थितीचे भान आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव राखून नाशिककर गणेशोत्सव साजरा करतील आणि त्याचा आनंद द्विगुणित करतील, असा विश्वास आहे.