कोंडी सोडविण्यासाठी सात पथक तैनात
शहर वाहतूक शाखेकडून पाहणी; नियोजनावर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठांसह उपनगरामध्ये गर्दी, त्यातच, सिंहस्थाच्या रस्त्यांच्या कामांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून सात पथकांची नियुक्ती केली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी, सहायक आयुक्त माधव रेड्डी यांनी प्रत्यक्ष गर्दीमुळे होणाऱ्या कोंडीच्या भागांची पाहणी करीत अतिरिक्त कुमक तैनात करण्यावर भर दिला आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी व सहायक आयुक्त माधव रेड्डी यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेच्या सात पथकांनी वर्दळीच्या ठिकाणांची पाहणी केली. सोमवारी (ता. १४) लाडक्या गणरायाला वाजत-गाजत घरी आणण्यासाठी भाविकांची सीबीएस, त्र्यंबक नाका, जुना गंगापूर नाका, पंचवटी, रविवार कारंजा, द्वारका, भद्रकाली, मुंबई नाका, उपनगर, नाशिकरोड या परिसरात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी झेब्रा पथक, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. गर्दीच्या वेळेत काही रस्ते तात्पुरते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. अंतर्गत रस्ते एकमेकांना जोडून पर्यायी मार्ग उपलब्ध केले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात एकेरी, दुहेरी वाहतुकीचे नियम लागू केले जाण्याची शक्यता वाहतूक शाखेने व्यक्त केली आहे.
उत्सवकाळात बाजारपेठा आणि मूर्ती केंद्रांवर भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो कारचा वापर टाळावा. सार्वजनिक वाहतूक, दुचाकी वा पायी यावे. यामुळे कोंडी टाळण्यास मदत होईल, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.