मेन
--
फोटो : H29557, H29559, H29560, H29558
श्री गणरायाच्या जयघोषाने नाशिक दुमदुमणार
आगमनासाठी भाविक, मंडळे सज्ज; पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : तयारीच्या लगबगीने गजबजलेल्या नाशिकमध्ये सोमवारी (ता. १३) श्रीगणेशाचे आगमन होत आहे. घराघरांत सजावटीची लगबग, मंडळांमध्ये आरास पूर्ण करण्याची धावपळ, बाजारपेठेत खरेदीसाठी झालेली गर्दी आणि रस्त्यांवर घुमणारा ढोलताश्यांचा निनाद अशा उत्सवी वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी भाविकांसह सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत.
गणेशोत्सवात नाशिकच्या वातावरणाला एक वेगळीच लय असते. पंचवटीपासून नाशिक रोडपर्यंत आणि गंगापूर रोडपासून जुन्या नाशिकपर्यंत विविध भागांतील गणेश मंडळांच्या मंडपांना अंतिम रूप देण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, पारंपरिक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या संकल्पनांनी मंडप सजले आहेत. अनेक मंडळांमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत आरास पूर्ण करण्याचे काम सुरू होते. घरगुती गणेशोत्सवाची तयारीही अंतिम टप्प्यात पोचली आहे. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, फुले, हार, दुर्वा, मोदकांसह नैवेद्याच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरही उत्सवी चित्र दिसत होते. यंदाच्या गणेशोत्सवाला एक विशेष योगायोग लाभला असून हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे. महिलांची हरितालिका पूजेची तयारी आणि गणेश स्थापनेची लगबग यामुळे घराघरांत पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. रोषणाईने उजळणारे मंडप, कानावर पडणारा ढोलताश्यांचा निनाद आणि अधूनमधून घुमणारा ‘गजानना श्री गणराया’चा जयघोष यामुळे नाशिकचे वातावरण गणेशमय झाले आहे.
--
अखंड सौभाग्यासाठी आज हरितालिका पूजन
नाशिक, ता. १३ : गणेशोत्सवाबरोबर हरितालिका पूजन पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणार आहे. अखंड सौभाग्यासाठी आणि इच्छित वर प्राप्तीसाठी महिला तसेच नवविवाहिता दिवसभर कडक उपवास धरून महादेव आणि माता पार्वतीची पूजा-अर्चा करतात.
सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती. पूजेसाठी लागणाऱ्या हरितालिका मूर्ती, वाळू, ताजी फळे, पाच प्रकारची पाने (पत्री) आणि फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. ऐतिहासिक श्री कपिलेश्वर मंदिर, गंगापूर रोडचे सोमेश्वर मंदिर आणि पंचवटीतील रामकुंड परिसरात हरितालिका पूजनासाठी व्यवस्था केली आहे. गोदावरीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करून पूजा करण्याची जुनी परंपरा असल्याने, अनेक महिला सकाळीच गोदाकाठी एकत्र येऊन पूजा करतात. मंगळवारी ऋषीपंचमी असल्याने गोदाकाठावर स्थानासाठी महिलांची माेठी गर्दी होणार असल्याने गोदाकाठी आवश्यक स्वच्छतागृह व निवाऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. दिवसभराच्या उपवास आणि पूजेनंतर मंगळवारी गणेश चतुर्थीला उत्तरपूजा करून या व्रताची सांगता होईल.
---
उत्सवासाठी शहर सज्ज
-घरगुती व सार्वजनिक गणेश स्थापनेसाठी तयारी पूर्ण
-मंडप व विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात
-गणेशमूर्ती व पूजासाहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
-ढोल-ताशा पथकांकडून स्वागताची तयारी
-सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांवर मंडळांचा भर
-हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने धार्मिक वातावरणाला विशेष रंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.