पान १
---------------
NSK26H29689
नाशिक : तलाठ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा तलाठी संघाकडून धरणे आंदोलन करण्यात आले.
----------
जिल्ह्यात तलाठ्यांचे आजपासून कामबंद
---
निलंबनाविरोधात आक्रमक; प्रांताधिकारी दत्ता यांची बदली करावी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : इगतपुरी तालुक्यातील पाच तलाठी, तसेच एका मंडलाधिकाऱ्यांविरोधात प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी केलेल्या कारवाईवरून जिल्ह्यातील तलाठी व मंडलाधिकारी आक्रमक झाले असून, मंगळवारी (ता. १५) त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. निलंबन मागे घेताना प्रांताधिकारी पवन दत्ता यांची बदली करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रशासनाकडून जिल्हा तलाठी महासंघाशी चर्चा करण्यात आली, मात्र महासंघ मागण्यांवर ठाम असून, बुधवार (ता. १६)पासून कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
इगतपुरी तालुक्यातील दफ्तर तपासणीवेळी प्रांत दत्ता यांनी तीन तलाठ्यांचे निलंबन केले. दोन तलाठी व एका मंडलाधिकाऱ्याची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. या विरोधात नाशिक जिल्हा तलाठी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महासंघाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांकडून फेरफार नोंदीवेळी मानवी किंवा तांत्रिक चुका झाल्या, किंवा होऊ शकतात. या नोंदी दुरुस्तीसाठी नियमात तरतूद आहे. पण, प्रांतधिकाऱ्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून कारवाईचा बडगा उगारल्याचा आरोप महासंघाने केला. संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन हे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल नेहमीच चुकीचे आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांबरोबर त्यांचे वर्तन योग्य नसल्याने संबंधित अधिकाऱ्याची बदली करावी. निलंबन बिनशर्त मागे घ्यावे, अशी मागणी महासंघाने केली आहे.
तलाठी महासंघाने मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे राज्याध्यक्ष नीळकंठ उगले, जिल्हाध्यक्ष संजय गाडे, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, महिला उपाध्यक्षा प्रीती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
---
समन्वयाचा प्रयत्न असफल
तलाठी महासंघाशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तीनसदस्यीय समन्वय समिती स्थापन केली आहे. समितीत निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे व महसूल चिटणीस आबासाहेब तांबे यांचा समावेश आहे. समितीने दिवसभरात तीनवेळेस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण, महासंघ मागण्यांवर ठाम असल्याने या चर्चा निष्फळ ठरल्या. आंदोलन कायम राहील, अशी माहिती महासंघाचे सरचिटणीस अरुण फसाळे यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.