अँकर---पान २ साठी
--------------
साहित्य परिषदेच्या अभ्यासिका-वाचनालयाचा मार्ग मोकळा
---
इमारतीच्या भाडेपट्ट्यावरील १५ लाखांचे मुद्रांक शुल्क माफ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : शहरातील साहित्यिक, वाचक आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाची सुविधा उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक महापालिकेच्या मालकीची अभ्यासिका व वाचनालयाची इमारत महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिक शाखेला भाडेतत्त्वावर देण्यासाठी करण्यात येणाऱ्या भाडेपट्टा करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. १५) घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रस्ताव मांडला.
परिषदेच्या नाशिक शाखेसाठी अभ्यासिका आणि वाचनालयाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध होण्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. महापालिकेच्या मालकीची इमारत साहित्यिक उपक्रमांसाठी वापरली जाणार असल्याने शहरातील वाचनसंस्कृतीला संस्थात्मक आधार मिळण्याची अपेक्षा आहे. इमारतीच्या मालकी हक्काबाबत मात्र यात कोणतीही सूचना नाही. भाडेपट्टा करारासाठी आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याने करारनामा नोंदणीची प्रक्रिया सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या काही अभ्यासिका अनेक वर्षे बंद असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी अभ्यासिकांचा आधार घ्यावा लागत होता. साहित्यिक संस्थांना पायाभूत सुविधा आणि आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीने नाशिकला मिळालेल्या निर्णयांची ही पुढची शृंखला ठरत आहे. मुद्रांक शुल्क माफ झाल्याने भाडेपट्टा करारनामा करण्यातील आर्थिक अडथळा दूर झाला. करारनामा पूर्ण करून इमारतीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यावर अभ्यासिका, वाचनालय आणि साहित्यिक उपक्रम सुरू करण्याची पुढील प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
---
शुल्कमाफीचा नेमका परिणाम
भाडेपट्टा करारनाम्यावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागते. हे शुल्क माफ झाल्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला कराराच्या नोंदणीवेळी होणारा हा आर्थिक खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे महापालिकेची इमारत भाडेपट्ट्याने घेण्याची प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या सुलभ होऊन अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे.
------------
कोट
नाशिक महापालिकेच्या मालकीच्या देवी चौक, नाशिक रोड येथील प्रशासकीय इमारतीत अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोडला नाममात्र भाड्याने बांधीव मिळकत मिळाली आहे. भाडेकरारनामा नोंदविण्यासाठी लागणारे जवळपास साडेपंधरा लाख रुपये मुद्रांक अधिक नोंदणी शुल्क माफीसाठी मंत्री छगन भुजबळ आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी शिफारस केली, ती मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाली.
- उन्मेष गायधनी, अध्यक्ष, मसाप, शाखा नाशिक रोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.