जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त
सपना गोडसे : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १६ : सणासुदीचा काळ लक्षात घेता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, शहादा व खांडबारा येथे विविध ठिकाणी तपासणी करून भेसळीच्या संशयावरून पेढा, मोतीचूर लाडू, मावा, कलाकंद यासह विविध दुग्धजन्य पदार्थांचा एकूण २१० किलो वजनाचा सुमारे आठ हजार ५८५ रुपये किमतीचा साठा जप्त करून नष्ट केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त सपना गोडसे यांनी दिली.
सणासुदीच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षितता तपासण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने संशयित ठिकाणी तपासणी केली. यादरम्यान काही ठिकाणी अन्नपदार्थाची गुणवत्ता संशयास्पद वाटली. तसेच, विहित मानकांचे उल्लंघन व स्वच्छतेचा अभाव आढळून आला. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई करत सुमारे ८५ हजार रुपये किमतीचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. हा साठा मानवी सेवनासाठी असुरक्षित, निकृष्ट दर्जाचा अथवा भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तो नष्ट करण्यात आला. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्ती अथवा विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी मिठाई, मावा तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या पदार्थाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा कुठेही अन्नभेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सपना गोडसे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.