दोन आठवड्यांनंतरही मतदारांना नोटिशीची प्रतीक्षा
जिल्हा निवडणूक विभाग : हरकतीसाठी २९ सप्टेंबरची मुदत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : मतदारयादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर) प्रारूप याद्यांच्या प्रसिद्धीला दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला. पण सात लाख ३४ हजार ६८५ मतदारांपर्यंत अजूनही सुनावणीच्या नोटिसा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. दरम्यान, प्रारूप यादीवर हरकती-सूचनांसाठी २९ सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत असणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एसआयआरचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या टप्प्यात मतदारांना २९ तारखेपर्यंत प्रारूप यादीवर हरकती, सूचना व अभिप्राय नोंदविता येतील. तसेच ज्या मतदारांच्या माहितीत संदिग्धता आढळून आली, अशा व्यक्तींना प्रशासन नोटीस बजावून सुनावणीसाठी पाचारण करणार आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने सात लाख ३४ हजार ६८५ मतदारांना नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात संपर्क होऊ न शकलेल्या तीन लाख दोन हजार ८२७ मतदारांचा समावेश आहे. तसेच चार लाख ३१ हजार ८५८ मतदारांच्या माहितीत तेरा प्रकारच्या तफावती आढळून आल्या. नाव, मुलाच्या व पालकांच्या वयातील अंतर, निवासस्थानाचा पत्ता, नावात अपूर्णता अशा विविध १३ प्रकारची माहितीत तफावत आढळून आली. या सर्व मतदारांना आता सुनावणीसाठी पाचारण करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नोटिशीवर दोन भाषांत मजकूर
सुनावणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या मतदारांना नोटीस बजावली जाईल. या नोटिशीच्या एका बाजूला मराठीत, तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीत मजकूर छापण्यात आला आहे. आयोगातर्फे सुनावणीची तारीख व वेळ नोटिशीवर देण्यात येणार असून, ठिकाण प्रशासन नमूद करणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये नोटीस छपाई करून मतदारांना त्या वितरणास सुरुवात होईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मधुमती सरदेसाई यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.