सहा तालुक्यांत दुष्काळाचे सावट
---
बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भुसावळचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : जिल्ह्यात यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सहा तालुक्यांत दुष्काळाचे सावट असेल, अशी स्थिती पीकस्थितीवरून दिसत आहे. यात बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भुसावळ तालुक्यांचा समावेश आहे. खरिपाच्या उत्पन्नात ५० टक्के घट येणार आहे. महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू उडीद, तूर, सोयाबीन, काही ठिकाणी कपाशी या पिकांच्या उत्पादनात घट आली आहे.
गेल्या शनिवारी (ता. १२) व रविवारी (ता. १३) या दोन दिवसांच्या पावसाने काही पिकांना जीवदान मिळाले असले, तरी उडीद, तूर, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आहे. बागायती शेती करणाऱ्यांच्या कपाशीचे उत्पन्न यंदा चांगले येणार आहे. सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.
यंदा जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलैत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. अनेक सिंचन प्रकल्पांत पाणीसाठा चांगला झाला. ५ ऑगस्टनंतर पावसाने मात्र ओढ दिली. ती २५ दिवस होती. त्यामुळे उडीद, मूग, तूर, सोयाबीन पीक हातचे गेले आहे.
बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भुसावळ तालुक्यांत पिकांची स्थिती बिकट आहे. कोरडवाहू पिकांचे उत्पादन काही ठिकाणी आले नाही. ज्या ठिकाणी आले तिचे ४० ते ५० टक्के उत्पादन घट असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे हे सहा तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. शासनाने या तालुक्यांतील पिकांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---
कोट
बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भुसावळ तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणी कोरडवाहू शेतीतील पिकांचे उत्पादन घटले आहे. परतीचा पाऊस चांगला बरसला, तर किमान रब्बी पिकांचे उत्पादन चांगले येईल. पंचनाम्याबाबत अजून आदेश मिळालेले नाहीत.
-के. एम. तडवी,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.