मोबाईल टॉवर चोरट्यांचे लक्ष्य
---
चार गुन्हे दाखल; चोरटा गुन्हेशाखेच्या तावडीत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल टॉवर चोरट्यांच्या निशाण्यावर आले असून, जनरेटरमधील डिझेल व बॅटऱ्यांची चोरी होत आहे. एकाच दिवसांत चार गुन्हे दाखल झाले. दरम्यान, गुन्हेशाखेच्या पथकाने डिझेल चोरीप्रकरणी एका संशयिताला अटक केली.
कडगाव शिवारातील उड्डाणपुलाजवळ मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून चोरट्याने २३० लिटर डिझेल चोरले. त्याची किंमत २० हजार ७०० रुपये आहे. बुधवारी (ता. २) रात्री ही चोरी झाली. भादली रेल्वे गेटजवळील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून चोरट्याने १९ हजार ८०० रुपयांचे २२० लिटर डिझेल चोरून नेले. तरसोद गावातील असोदा रस्त्यावरील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून चोरट्याने २१ हजार ६०० रुपयांचे डिझेल चोरून नेले. रविवारी (ता. १३) सायंकाळी ५ ते रात्री आठच्या सुमारास टॉवरजवळील जनरेटरमधून चोरट्याने २४० लिटर डिझेल चोरून नेले. खिर्डी शिवारातील पाटील नर्सरीसमोरील शेतातील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून चोरट्याने २८ ऑगस्टला २० हजार ७०० रुपयांचे २३० लिटर डिझेल चोरून नेले.
चौकट
अकलूदच्या तरुणाचे कारनामे
मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा संशयित समीर जानमोहंमद तडवी (वय ३०, रा. अकलूद, ता. यावल) याला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६५ लिटर डिझेल व ५० हजारांची रोकड जप्त केली. तडवी पूर्वी जनरेटरला डिझेल पुरविण्याचे काम करीत होता. बेरोजगार झाल्यानंतर त्याने डिझेल चोरी सुरू केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.