H29888
जाहिरातींना अडथळा;
५५ झाडांची कत्तल
नम्रता ॲडव्हर्टायझिंगच्या देशमुखसह सहा जण गजाआड
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : गंगापूर रोडवरील दुभाजकातील झाडे जाहिरात फलक उभारण्यास अडथळा ठरत असल्याने जाहिरात एजन्सीचालकाने दहा हजार रुपये देऊन तब्बल ५५ झाडांची रातोरात कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी जाहिरात एजन्सीचालकासह सहा जणांना अटक केली. न्यायालयाने संशयितांना सोमवारपर्यंत (ता. २१) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अभिमन काशीनाथ खैरनार (३७, रा. मालेगाव), दिलीप सदू बेंडकुळे (३४), दीपक संतोष दाते (२५), रोहिदास पांडुरंग खुरखुटे (४५), अर्जुन दत्तू चारोस्कर (३८) आणि नम्रता जाहिरात संस्थेचा चालक मच्छिंद्र विजय देशमुख (४४, सर्व रा. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
महापालिकेचे अधिकारी श्रीकांत किसन इरणक यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील दुभाजकात इंडियन ख्रिसमस ट्री प्रजातीची झाडे लावण्यात आली होती. ३० ऑगस्टच्या पहाटे अभिमन खैरनार याने वीज कटरने या मार्गावरील ५५ झाडे कापून टाकली. हा प्रकार तेथील दृश्यचित्रण यंत्रणेत कैद झाला होता. मात्र, तब्बल १५ दिवसांनी हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला.
गंगापूर रोडवरील दुभाजकात जाहिरात फलक उभारण्याचा ठेका नम्रता जाहिरात संस्थेने घेतला होता. फलक उभारण्यासाठी दुभाजकातील झाडांचा अडथळा येत असल्याने मच्छिंद्र देशमुख याने अभिमन खैरनार याला झाडे तोडण्यासाठी दहा हजार रुपये दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर खैरनार याने तीन मजुरांच्या मदतीने वीज कटरने ५५ झाडे कापली.
कत्तल केलेली झाडे दीपक बेंडकुळे याने वाहनातून वाहून नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या सुमारे दोन लाख ७५ हजारांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.