पात्र वनपट्टेधारकांना योजनांचा लाभ द्या
मंत्री उईके : जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटीप्रसंगी सूचना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : जिल्ह्यातील पात्र वनहक्क पट्टेधारकांना विविध शासकीय योजना तसेच वनपट्टयांचा लाभ देण्यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री अशोकजी उईके यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. यावेळी आदिवासी बांधवांनी मागणी केल्यापेक्षा कमी क्षेत्र वनहक्क म्हणून मंजूर झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री उईके यांनी गुरुवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयातील वनहक्क कक्षास भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
मंत्री उईके म्हणाले, वनहक्क पट्टे प्रस्तावांमध्ये संबंधित क्षेत्राबद्दल आवश्यक पुरावे उपलब्ध असताना ही केवळ तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या दाव्यांची फेरपडताळणी करावी. त्यासाठी संबंधित ग्राम वनहक्क समिती व उपविभागीय समितीमार्फत अशा प्रकरणांची आवश्यक ती पडताळणी करावी. तसेच पात्र वनहक्क धारकांना नियमानुसार वनपट्टा मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
वनहक्कधारकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना मिळालेल्या वनहक्कांची प्रभावी अंमलबजावणी व त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी विभागीय समन्वयातून ठोस कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री उईके यांनी दिले. जिल्हा वनहक्क व्यवस्थापक विक्रम कदम यांनी वनहक्क कक्षाकडून जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांची पडताळणी, मंजूर व प्रलंबित दावे, वनपट्टा वितरण तसेच वनहक्कधारकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठीची माहिती दिली. दरम्यान, मंत्री उईके यांनी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देताना सिंहस्थ नियोजनात आदिवासी संस्कृती व परंपरेचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना केल्या.
सेवा संकल्पात लाभ द्या
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दिलेल्या मुदतीत पात्र वनहक्कधारकांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना मंत्री उईके यांनी दिल्या. तसेच वनहक्कधारकांना वनपट्टा मिळाल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या हक्कांची नोंद व महसूलविषयक कार्यवाही सुलभ करण्यासाठी सातबारा उतारा, ८-अ, पोटहिस्सा मोजणी तसेच संबंधित इतर आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
फोटो क्रमांक : एच-29905
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.