उपवर्गीकरण विरोधात ३ ऑक्टोबरला मोर्चा
माजी मंत्री बबन घोलप, शिंदे यांची पत्रपरिषदेत माहिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : राज्य शासनाने सुरू केलेल्या अनुसूचित जाती (एससी) आरक्षण उपवर्गीकरणास तीव्र विरोध होत आहे. नाशिकमध्ये ३ ऑक्टोबरला ५९ उपजातींच्या सहभागातून बी. डी. भालेकर हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री बबन घोलप आणि रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील बदर समितीचा अहवाल खुला न करता त्यावर हरकती मागविल्या जात आहेत. त्या अहवालात नेमके काय आहे, हे समाजाला कळले, तर त्यावर प्रश्न उपस्थित करता येतील. संविधान लागू करण्यापूर्वी सहा महिने हरकती मागविण्यात आल्या होत्या. या हरकती निकाली निघाल्यानंतर संविधान लागू झाले. या संविधानाने कलम ३४१ अंतर्गत आरक्षणाचा अधिकार बहाल केला. पण त्याला हरताळ फासण्याचे काम हे सरकार उपवर्गीकरणाच्या माध्यमातून करीत असल्याचा आरोप माजी मंत्री घोलप यांनी केला.
मोर्चाला रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे सहभागी होतील, अशीही माहिती या वेळी देण्यात आली. नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटे, लक्ष्मीताई ताटे, राजेंद्र बागूल, दत्तात्रय गोतीसे, जितेंद्र शार्दूल, वामनराव गायकवाड आदी उपस्थित होते.
ढोबळे यांच्यावर गुन्हा दाखल करा
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सचिन साठे याला सहआरोपी करण्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.