पाणी पिण्यासाठीच; सिंचनाचा निर्णय नंतर
गिरीश महाजन : अल्प पावसामुळे पिके धोक्यात; दुष्काळी भागांत पंचनाम्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके धोक्यात आल्याने दुष्काळी भागांतील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता. १९) दिली. धरणांतील उपलब्ध पाणी प्रथम पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवले जाईल, त्यानंतर अन्य वापराबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात पाऊस महिनाभर उशिराने दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिकांवर संकट आले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातील परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकात्मिक नदीजोड प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या माध्यमातून विदर्भातील आठ जिल्ह्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, त्यातून सुमारे दहा लाख हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होईल. उद्योगांसाठीही पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
नारपार, दमणगंगेतून पाणी
नारपार आणि दमणगंगा नदीजोड प्रकल्पातून नाशिक, जळगावसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. नारपार प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार ५०० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, आणखी सात हजार कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. दमणगंगा प्रकल्पातून ६० टीएमसी पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती महाजन यांनी दिली. महापालिकेच्या आकृतिबंधास लवकरच मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दिशा सॅलियान प्रकरणात त्यांच्या वडिलांनी आमदार आदित्य ठाकरे यांना बजावलेल्या ५०० कोटी रुपयांच्या नोटिशीबाबत महाजन यांनी सावध भूमिका घेतली. ‘या प्रकरणात कोणावरही थेट आरोप करणार नाही. चौकशीतून सत्य समोर येईल आणि दोषींवर कारवाई होईल,’ असे त्यांनी सांगितले.
जिल्हा महसूल विभागातील बनावट स्वाक्षरीद्वारे भरती प्रकरणीही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारची प्रकरणे अनेक वर्षांपासून समोर येत असतानाही नागरिक अशा भूलथापांना कसे बळी पडतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.