टुडे पान ४ : मेन फिचर
NSK26H30067
जळगाव : शहरातून मालवाहू रिक्षातून होत असलेली आसाऱ्यांची धोकादायक वाहतूक.
---
‘ओव्हरलोड’ वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या जिवाशी खेळ
क्षमतेपेक्षा अधिक मालाची सर्रास वाहतूक; अपघातांचा धोका; नियमित तपासणीची गरज
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : शहरासह जिल्ह्यातील विविध मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक माल भरून धावणाऱ्या ओव्हरलोडेड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाळू, मुरूम, खडी, बांधकाम साहित्य तसेच अन्य मालाची वाहतूक करणाऱ्या काही अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात माल भरला जात असल्याने या वाहनांमुळे इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी मालवाहू रिक्षात लांब आसाऱ्या वाहून नेल्या जात असल्याने अन्य वाहनधारकांना धोका निर्माण होत आहे.
वेगाने धावणारे आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणारे ट्रक, डंपर व इतर अवजड वाहने रस्त्यावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. ओव्हरलोड वाहनांचा वेग कमी होणे, ब्रेकिंगचे अंतर वाढणे, वाहनाचा ताबा सुटण्याची शक्यता तसेच टायर व अन्य यांत्रिक भागांवर अतिरिक्त ताण येणे, असे धोके निर्माण होतात. परिणामी अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः अरुंद रस्ते, घाटमार्ग, वळणे आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा वाहनांमुळे दुचाकीस्वार व छोट्या वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होतो.
महामार्गांवरही परिणाम
ओव्हरलोड वाहनांचा परिणाम केवळ अपघातापुरता मर्यादित राहत नाही. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची सतत वाहतूक झाल्याने रस्त्यांच्या मजबुतीवरही परिणाम होतो. खड्डे पडणे, रस्त्याचा पृष्ठभाग खराब होणे आणि पुलांवर अतिरिक्त भार येणे यामुळे सार्वजनिक पायाभूत सुविधांवर ताण वाढतो. केंद्र सरकारनेही २०२६ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील ओव्हरलोड वाहनांसाठी सुधारित शुल्कव्यवस्था लागू करताना रस्ता सुरक्षा आणि महामार्गांच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण हा उद्देश स्पष्ट केला आहे.
वाळू वाहतूकही ऐरणीवर
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. १८ सप्टेंबरला पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील गिरणा नदीपात्रात महसूल, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरली जाणारी २९ वाहने जप्त करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीही अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या जप्त वाहनांच्या लिलावासंदर्भात अधिकृत घोषणा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे वाळू व गौणखनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांची क्षमता, परवाने आणि वाहतुकीचे नियम यांची काटेकोर तपासणी करण्याची गरज आहे.
वाहनधारकांमध्ये भीती
रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ओव्हरलोड डंपर आणि ट्रकच्या शेजारून जाताना मोठी कसरत करावी लागते. अचानक ब्रेक लागणे, मालाचा काही भाग रस्त्यावर पडणे किंवा वाहनाचा समतोल बिघडणे यामुळे मागून अथवा बाजूने येणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
चौकट
वजन तपासणीची यंत्रणा हवी प्रभावी
राष्ट्रीय महामार्गांवर ओव्हरलोडिंग निश्चित करण्यासाठी प्रमाणित वजनमापन यंत्रांचा वापर करण्याची तरतूद केंद्राच्या २०२६ मधील सुधारित नियमांमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार वजनाच्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काची रचना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरही वाहनांची नियमित वजन तपासणी, रात्रीच्या वेळी विशेष पथकांची नियुक्ती आणि संवेदनशील ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबविल्यास ओव्हरलोड वाहतुकीला आळा बसण्यास मदत होऊ शकते. वाहतुकीचा वेग, वाहनाची क्षमता आणि रस्त्याची सुरक्षितता यांचा समतोल राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर वाहनमालक व चालकांचीही जबाबदारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.