फोटो: 30083
नाशिक : सर्पदंश जनजागृती जागर अभियानात मार्गदर्शन करताना सुशांत रणशूर, अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त राजेंद्रकुमार हिवाळे, सोनल दगडे आदी.
सर्पदंशानंतर अघोरी उपचार जिवावर बेतात
सुशांत रणशूर : सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये ''सर्पदंश जनजागृती''चा जागर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२१ : सर्पदंशानंतर घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रुग्णाला धीर देणे गरजेचे असते. प्राथमिक उपचार करून रुग्णाला तात्काळ व सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करावे. स्थानिक पातळीवर केले जाणारे अघोरी व चुकीचे उपचार रुग्णाच्या जिवावर बेतू शकतात, असे सर्पअभ्यासक सुशांत रणशूर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आदिवासी विकास विभाग राज्यभर ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबवत आहे. शनिवारी (ता.१९) या अभियानाअंतर्गत नाशिक अपर आयुक्त कार्यालय अधिनस्त शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य आदर्श निवासी शाळा आणि वसतिगृहांमधील तब्बल सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांशी डिजिटल स्टुडिओद्वारे थेट संवाद साधला.
सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त राजेंद्रकुमार हिवाळे, उपआयुक्त नीलेश अहिरे, स्वप्नील साबळे, ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनचे संचालक तथा सर्प व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, अर्थ फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सोनल दगडे, सर्प व वन्यजीव अभ्यासक राहूल नाईक, अनुपम सराफ, कार्यालयीन अधीक्षक अविनाश शिवरामे, सहायक प्रकल्प अधिकारी (प्र.) सुनील नेरकर, रामचंद्र तडवी, निंबा कापडणीस उपस्थित होते.
आश्रमशाळा व वसतिगृहांतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्पदंशाबाबत मनात असणारी भीती आणि गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहिती व योग्य प्रथमोपचारांचे धडे मिळणे गरजेचे होते. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी सव्वादोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.
-दिनकर पावरा, अपर आयुक्त (नाशिक)
चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे
- अन्नसाखळी व परिसंस्थेचे महत्त्व
- विषारी व बिनविषारी सर्पांची ओळख
- सर्पदंशानंतरचे प्रथमोपचार व प्रात्यक्षिक
- अंधश्रद्धा व चुकीच्या उपचारांवर आघात
- आश्रमशाळा परिसर स्वच्छतेवर भर
- सर्पदंश प्रतिबंध-आवश्यक उपाययोजना
- सुरक्षित वर्तन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद
- वेळेवर वैद्यकीय उपचार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.