प्लायर
--
लोगो : सकाळ संवाद
--
फोटो : H30234
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सिंहस्थाचे सुक्ष्म नियोजन
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक : गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी १० हायटेक मोबाईल व्हॅन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, अप्रिय घटना न घडता सिंहस्थ यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता, तंत्रज्ञानाच्या आधारे बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन केले आहे. पोलिस नियंत्रण कक्षासह सिंहस्थ प्राधीकरण आणि महापालिकेच्या स्मार्टसिटीचे ‘आय-ट्रीपल सी’ आधुनिक स्वरूपाचे नियंत्रण कक्ष उभारले आहेत. जेणेकरून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ‘एआय बेस’ सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणार आहे. सिंहस्थ निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वांगाने सुक्ष्म नियोजन केल्याचे शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘सकाळ संवाद’ उपक्रमात सांगितले.
.....
जुना मुंबई- आग्रा महामार्गावरील कालिका प्लाझा संकुलातील ‘सकाळ’ कार्यालयात पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सोमवारी (ता. २१) संवाद साधला. सिंहस्थाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या उपाययोजना, बंदोबस्त, वाहतूक विषयांवर सविस्तर माहिती त्यांनी दिली. ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील यांच्या हस्ते पोलिस आयुक्त कर्णिक यांचा सत्कार झाला. या वेळी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांचीही उपस्थिती होती.
आयुक्त कर्णिक म्हणाले, सिंहस्थासाठी १२ ते १५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून अजूनही काही उपाययोजनांवर काम सुरू आहे. त्यासाठी देशभरातीलच नव्हे तर जगभरातील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. तसेच, एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी नियोजन केले आहे. प्रयागराज येथील सिंहस्थात सुमारे ५० घाट केले होते. तरीही भाविकांना संगमावरच जाण्याचा अट्टहास होता. तसेच, नाशिकमध्ये भाविकांना रामतीर्थावर जाण्याचा कल राहिल. परंतु नाशिकमध्ये स्नानासाठी गोदावरी नदीवर १८ घाटांची निर्मिती केली आहे. १० ते १२ रस्त्यांवर ठराविक अंतरावर भाविकांसाठीचे थांबे केले आहेत. जेणेकरून एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिकची भाविकांची गर्दी टाळणे शक्य होईल, असे सांगितले.
.....
गर्दीचे एआय बेस व्यवस्थापन
शहरात चार हजारपेक्षा अधिक सीसीटीव्ही बसविणार असून, ते कायमस्वरूपी राहतील. गर्दीचे व्यवस्थापनासाठी एआय बेस सीसीटीव्ही असतील. त्यामुळे एखाद्या स्पॉटवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास त्याची आगाऊ सूचना पोलिस नियंत्रण कक्षाला मिळेल. परिणामी, जास्तीची गर्दी होऊन यामुळे आपत्कालीन परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे.
---
प्रयागराज सिंहस्थावरून धडा
प्रयागराज येथे झालेल्या सिंहस्थासाठी ४५ दिवस भाविकांची अलोट गर्दी होती. अत्यंत काटेकोर नियोजन करूनही चेंगराचेंगरीसारखी घटना घडली. या घटनेचा सुक्ष्म अभ्यास नाशिकच्या पोलिस अधिकाऱ्यांनी केला असून, अशी आपत्कालीन घटना घडू नये यासाठी नियोजन केले आहे. सुमारे ३५ हजार पोलिस अधिकारी- अंमलदार राज्यभरातून सिंहस्थात येणार आहेत. या सर्वांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून प्रत्येकाला जबाबदारीची आगाऊ माहिती असणार आहे. यासाठी आधुनिक यंत्रसामग्री असेल, शिवाय प्रत्येकाकडे वॉकिटॉकी असणार आहे. जेणेकरून सहज संपर्क साधणे शक्य होईल.
....
‘व्हीव्हीआयपीं’साठी स्वतंत्र रुट
अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही पर्वणी काळात येतील. परंतु त्यांच्यासाठी प्रत्येक घाटावर स्वतंत्र रुट तयार केला आहे. अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला रामतीर्थावर जाण्यासाठी नदीमार्गातून बोटीतून नेण्याचेही नियोजन केलेले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमुळे भाविकांना त्रास होणार नाही, हाच यामागील उद्देश आहे.
....
गस्ती वाहने अन् निगराणी
सिंहस्थामध्ये भाविकांप्रमाणे काही अपप्रवृत्ती वा गुन्हेगारांचा वावर असणार आहे. अशा प्रवृत्तीला वा दहशतवादी कृत्याला वेळीच अटकाव करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल १० मोबाईल व्हॅन प्राप्त झाल्या आहेत. या व्हॅनवर आधुनिक सीसीटीव्ही बसविलेले आहेत. आयबी, एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसकडील दहशतवादी, गुन्हेगारांचा डाटा पोलिसांकडे असेल. गर्दीवर निगराणी ठेवणारे आधुनिक सीसीटीव्ही त्या डाटाशी संलग्न असतील. गर्दीत गुन्हेगार वा दहशतवादी सीसीटीव्हीत कॅप्चर झाल्यास त्याची तात्काळ माहिती मिळेल आणि गुन्हेगारी घटनेला अटकाव करता येणे शक्य होणार आहे.
....
स्थानिकांचे सहकार्य मोलाचे
कुंभमेळा निर्विघ्न अन् यशस्वी करण्यासाठी नाशिककरांचा सहभाग व सहकार्य मोलाचे ठरणार आहे. ३५ हजार पोलिस बंदोबस्ताला असतील. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून एनएसएसचे १० ते १५ हजार स्वयंसेवक, सेवाभावी, सामाजिक, राजकीय संघटनाचे निवडक कार्यकर्तेही पोलिसांच्या मदतीला असणार आहेत. त्यासाठी प्रत्येक घटकाशी संपर्क साधून त्यांचा सहभाग, सहकार्य घेतले जाणार आहे.
.....
वाहतुकीचे काटेकोर नियोजन
रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या मार्च २०२७पर्यंत ९० टक्के कामे पूर्ण होतील. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत द्वारका सर्कल येथील काम पूर्णत्वास जाईल. यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. बाह्य रिंगरोडमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. बाह्य वाहनतळावरून घाटानजीकच्या वाहनतळापर्यंत येण्यास भाविकांना मोफत शटल बससेवा उपलब्ध असणार आहे. प्रत्येक चौकात भाविकांना मार्ग दाखविण्यासाठी वाहतूक पोलिस असणार आहे. बॅरिकेटींग टप्प्या-टप्प्याने केले जाईल. शाही पर्वणीकाळात प्रमुख रस्ते बंद असतील. परंतु त्याचवेळी रुग्णवाहिका, महत्त्वाच्या खरेदीसाठीचे मार्ग खुले असतील.
----कोट
‘कायद्याचा बालेकिल्ल्या’चा फायदाच
‘नाशिक जिल्हा, गुन्हेगारांचा बालेकिल्ला’ अशी एक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. चिथावणीखोर कृत्य असल्याने ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असे पोलिसांनी त्यावर प्रतित्युर दिले. अर्थात त्यानंतर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यास मदत झाली. ऐन सिंहस्थापूर्वीच शहरातील बहुतांशी गुन्हेगार व टोळ्या आज गजाआड आहेत, हे शहराच्या शांततेच्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहे.
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.