पत्नीचा खून, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : चौघांची निर्दोष मुक्तता
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : चार वर्षांपूर्वी झालेल्या कौटुंबिक वादातून लाकडी दांडा असलेल्या लोखंडी फावड्याने मारहाण करून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल; तर पुराव्याअभावी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
विशाल राजाराम कापसे (वय ३०, रा. माळवाडी, मांडसांगवी, जि. नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ता. १६ मे २०२२ ला रात्री अकराच्या सुमारास माळवाडी येथे ही घटना घडली होती. विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर मंडळी जमवून जुन्या भांडणाची कुरापत काढून आरती विशाल कापसे हिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान विशालने घराजवळ पडलेला लाकडी दांडा असलेला लोखंडी फावडा उचलून आरतीच्या डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला होता.
या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून भक्कम पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करीत, साक्षीदार, पंच आणि तपासी अंमलदारांची साक्ष नोंदविली. परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी विशाल कापसे याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, खटल्यात सुरेश कापसे, निवृत्ती कापसे, शोभा ऊर्फ अलका कापसे आणि बंटी कापसे या चौघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक जयवंत गुळवे, महिला पोलिस हवालदार संगीता बहिरम यांनी पाठपुरावा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.