चव्हाण व जेजूरकर न्यायालयात- H30325
डॉ. जेजूरकर, डॉ. चव्हाण
नाशिक मध्यवर्ती कारागृहात
---
मोबाईल जप्त; सोशल मीडिया चॅटच्या आधारे तपास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (ता. २२) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, त्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
डॉ. मनीषा जेजूरकर यांनी ६ मार्चला गंगापूर रोड परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणी रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांचा जेजूरकर दांपत्याच्या कौटुंबिक आयुष्यात हस्तक्षेप होता, तसेच डॉ. नीलेश जेजूरकर व डॉ. चव्हाण यांच्यात मैत्रीपलीकडील संबंध असल्याचा जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
डॉ. जेजूरकर यांना १८ सप्टेंबरला, तर डॉ. चव्हाण यांना २० सप्टेंबरच्या रात्री अटक करण्यात आली होती. दोघांची पोलिस कोठडी मंगळवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकार पक्षाने संशयितांचे मोबाईल जप्त केले असून, त्यातील सामाजिक माध्यमांवरील संदेशांचा तपास करायचा असल्याने पोलिस कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाचे ॲड. अविनाश भिडे यांनी त्यास विरोध करीत, गुन्हा दाखल झाल्यावर सहा महिन्यांनी अटक करण्यात आली असून, दोघांनीही तपासात सहकार्य केले आहे. त्यामुळे पुन्हा पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सहायक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.