फोटो -NSK26H31650
...आणि नियतीनेही आर्चरच्या कथेचा शेवट लिहिला!
आपल्या अफाट लेखन शैलीने जागतिक साहित्यविश्वावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिलेले माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आर्चर यांच्या ‘ॲडम आणि इव्ह’ या बहुप्रतिक्षित आणि शेवटच्या कादंबरीच्या जागतिक प्रकाशनाच्या एक दिवस आधी त्यांची प्राणज्योत मालवली.
- डॉ. स्वप्नील तोरणे, जनसंवाद तज्ज्ञ
जेफ्री आर्चर यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य अत्यंत नाट्यमय राहिले. एकीकडे कोट्यवधी वाचकांच्या मनावर राज्य करणारा प्रतिभावंत लेखक आणि दुसरीकडे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला राजकारणी, अशा दोन टोकांवर त्यांचे आयुष्य हेलकावे खात राहिले. तब्बल पाच दशकांच्या प्रदीर्घ लेखन प्रवासात त्यांनी प्रचंड यश मिळवले. चुकीच्या गुंतवणुकीमुळे एकदा ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. परंतु स्वतःच्या याच अनुभवातून प्रेरणा घेऊन त्यांनी १९७६ मध्ये ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ ही कादंबरी लिहिली. त्यांची पहिलीच कादंबरी प्रचंड यशस्वी ठरली.
जेफ्री आर्चर यांच्या साहित्याच्या लोकप्रियतेचा विचार करताना काही आकडे अक्षरशः थक्क करून सोडतात. त्यांच्या पुस्तकांच्या ३० कोटींपेक्षा अधिक प्रतींची विक्री, जगातील ११९ देशांपर्यंत पोहोचलेले साहित्य आणि ४७ हून अधिक भाषांमध्ये झालेले अनुवाद ही केवळ व्यावसायिक यशाची आकडेवारी नाही; ती एका कथाकाराने निर्माण केलेल्या जागतिक वाचकविश्वाची साक्ष आहे. एखाद्या लेखकाचे पुस्तक एका देशात लोकप्रिय होणे ही साहित्यिक घटना असते; परंतु एका लेखकाच्या कथा अनेक संस्कृती, भाषा आणि सामाजिक वास्तवांच्या सीमारेषा ओलांडून इतक्या व्यापक प्रमाणात वाचल्या जाणे, ही त्यापेक्षा मोठी सांस्कृतिक घटना आहे. आर्चर यांनी हे साध्य केले.
त्यांच्या कथांमध्ये ब्रिटिश सामाजिक जीवन, अमेरिकन भांडवलशाही, युरोपीय इतिहास, राजकारण, उद्योगविश्व, संपत्ती, सत्तासंघर्ष आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांचे संदर्भ असले तरी त्यांचा केंद्रबिंदू शेवटी माणूस हाच राहतो. महत्त्वाकांक्षेने पछाडलेला माणूस, अपयशातून उभा राहणारा माणूस, सूड घेणारा माणूस, प्रेम करणारा माणूस आणि परिस्थितीशी दोन हात करणारा माणूस या सार्वत्रिक भावनांमुळे आर्चरच्या कथा भौगोलिक सीमा ओलांडू शकल्या.
आर्चर हे मूलतः ‘स्टोरीटेलर’ होते. त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य भाषेच्या प्रयोगशीलतेत किंवा तत्त्वचिंतनाच्या गूढ खोलीत नसून कथेला वेग देण्यात, प्रसंगांची अचूक मांडणी करण्यात आणि वाचकाची उत्सुकता अखेरपर्यंत जागी ठेवण्यात आहे. आर्चर यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. त्यांची गद्यशैली प्रामुख्याने स्वच्छ, संवादप्रधान आणि प्रसंगाभिमुख आहे.
आर्चर यांच्या जीवनातही नाट्याची कमतरता नव्हती. राजकारणातील महत्त्वाकांक्षा, आर्थिक चढउतार, सार्वजनिक वाद आणि तुरुंगवास या सगळ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक स्वतंत्र कथा निर्माण केली. तुरुंगवासाच्या अनुभवातून निर्माण झालेले ‘अ प्रिझन डायरी’ मध्ये कल्पित व्यक्तिरेखांऐवजी स्वतःचा अनुभव, निरीक्षण आणि आत्मपरीक्षण समोर येते. त्यामुळे लेखक म्हणून आर्चरच्या अंतर्मुख बाजूची झलक मिळते.
ज्याने आयुष्यभर वाचकांना सांगितले, की कथा शेवटपर्यंत आपल्या हातात राहत नाही, त्याच्या स्वतःच्या जीवनकथेनेही शेवटच्या क्षणी अनपेक्षित वळण घेतले. जेफ्री आर्चर गेले, पण त्यांनी लाखो वाचकांना दिलेली ‘पुढचे पान उलटण्याची अस्वस्थ उत्सुकता’ अजून जिवंत आहे. याहून सुंदर श्रद्धांजली एका कथाकाराला दुसरी कोणती असू शकते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.