टुडे एक : शहर - जिल्ह मेन फिचर
NSK26H32344
जळगाव : बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने शिवाजी उद्यानाजवळील टीबी सेंटरमध्ये जमा केलेल्या घंटागाड्या.
........
वेतन थकल्याने ‘बीव्हीजी’चे कर्मचारी पुन्हा संपावर
मनपाकडे कंपनीचे २० कोटींचे बिल थकीत; कचरा संकलन ठप्प, त्रुटींवर प्रशासनाची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : वेतन थकल्याने शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. १४) पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाचे काम दिवसभर ठप्प झाले. ऐन सणासुदीच्या काळात घंटागाड्या आणि कचरा संकलनाची अन्य वाहने बाहेर न पडल्याने शहरात कचरा साचण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेकडे कंपनीचे सुमारे २० कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, स्वच्छतेच्या कामात सुधारणा होत नसल्याबद्दल महापालिका प्रशासनाने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.
जळगाव शहरातील दैनंदिन स्वच्छता आणि कचरा संकलनाचा मक्ता पुण्यातील बीव्हीजी कंपनीला सुमारे वर्षभरापूर्वी देण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आंदोलन करावे लागले आहे. यापूर्वी दोन ते तीन महिन्यांचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद ठेवले होते. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा केल्यावर तिसऱ्या दिवशी स्वच्छतेचे काम पुन्हा सुरू झाले होते. आता पुन्हा एक महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
घंटागाड्या वाहनतळावरच
बीव्हीजी कंपनीच्या घंटागाड्यांचे चालक, मदतनीस, झाडूकामगार आणि गटार सफाई कामगारांचे एक महिन्याचे वेतन थकले आहे. त्यामुळे सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. परिणामी, बुधवारी सकाळपासून टीबी सेंटर येथील वाहनतळावरून घंटागाड्या, कॉम्पॅक्टर आणि कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारी अन्य वाहने बाहेर पडली नाहीत. त्यामुळे शहरातील दैनंदिन कचरा संकलनावर परिणाम झाला.
हजेरी, जीपीएस यंत्रणेवरून नाराजी
काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आयुक्तांच्या दालनाबाहेरील बैठक कक्षात कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत हंगे, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि आरोग्य विभागाचे अभियंता समीर बोरोले यांच्यात बैठक झाली. यावेळी स्वच्छतेच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना देऊनही अपेक्षित बदल होत नसल्याबद्दल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अद्ययावत माहिती आणि आवश्यक माहितीचा तपशील वेळेवर मिळत नसल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. तसेच कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारी वाहने जीपीएस यंत्रणेत दिसत नसल्याने कामकाजाच्या देखरेखीत अडचणी येत असल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणून दिले.
त्रुटी दूर करण्यासाठी पुण्याहून पथक
हजेरी नोंदणी यंत्रणा आणि जीपीएसमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांनी पुण्याहून दोन ते तीन जणांचे तांत्रिक पथक आणले आहे. हजेरीच्या नोंदी आणि जीपीएस यंत्रणेतील त्रुटी बुधवारी रात्रीपर्यंत तसेच गुरुवारपर्यंत दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे व्यवस्थापक श्रीकांत हंगणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सात महिन्यांचे २० कोटींचे बिल थकीत
शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामापोटी महापालिकेकडून बीव्हीजी कंपनीला दरमहा सुमारे अडीच ते पावणेतीन कोटी रुपये दिले जातात. मात्र, मार्च महिन्यापासून सुमारे सात महिन्यांचे कंपनीचे २० कोटी रुपयांचे बिल महापालिकेकडे थकीत असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात देयके प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनांची दुरुस्ती आणि अन्य खर्च भागविताना कंपनीला अडचणी येत असल्याचे समजते.
कोट..
सफाई मक्तेदार यांनी त्यांच्या कर्मचार्यांचा वेतनाचा प्रश्न त्यांनी सोडवावा, काम बंद करून शहरातील कचरा कोंडी करणे योग्य नाही. तसेच बीव्हीजी कामात सुधारणा करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या असून त्या प्रत्यक्ष कामात दिसून येत नाही आहे. त्यांना त्यात तातडीने सुधारणा कराव्या. थकीत बिलाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे.
- आदित्य जिवने, आयुक्त. महापालिका जळगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.