सोलरसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी
न्याहळोद परिसरातील शेतकऱ्यांचा आरोप; पैसे भरलेल्यांना त्वरित सौरपंप द्या
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद, ता. १८ : शासनाच्या महत्त्वपूर्ण सौर कृषिपंप योजनेंतर्गत शेतीसाठी सौरपंप मिळावा, यासाठी न्याहळोद, तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक रक्कम भरली आहे. मात्र, सौरपंपाच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तींकडून शेतकऱ्यांकडे दीड ते दोन हजारांची मागणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रक्कम देणाऱ्या लाभार्थ्यांची प्रकरणे तत्काळ पुढे नेली जात असून, त्यांना सौरपंप उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलद केली जाते. मात्र, पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांची प्रकरणे जाणीवपूर्वक लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधीच पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
न्याहळोद व परिसरात सर्वेक्षणासाठी नियुक्त असलेल्या विश्वनाथ सुकवड यांच्याशी संबंधित सर्वेक्षण प्रक्रियेची चौकशी करून, शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पैशांची मागणी होत असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सर्वेक्षणाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून कोणत्याही लाभार्थ्यावर आर्थिक दबाव आणला जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
पैसे भरलेल्यांना सौरपंप द्या
शासनाच्या योजनेत ऑनलाइन अर्ज करून नियमानुसार पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त पैशांची मागणी न करता तातडीने सौरपंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित प्रकरणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची यादी, सर्वेक्षणाची स्थिती आणि सौरपंप वितरणाची प्रक्रिया स्पष्ट करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या योजनेचा लाभ मिळविताना शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी महावितरण व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.