पिंपळगाव बसवंत ठाण्यातील
हवालदार लाच घेताना ताब्यात
अर्ज चौकशीत मदत करून कारवाई टाळण्याचे आमिष
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी (ता. १५) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पिंपळगाव (बसवंत) पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
संशयित हवालदार संतोष राघो ब्राह्मणे (वय ४४, रा. आडगाव) हे नाशिक ग्रामीण विभागातील पिंपळगाव (बसवंत) पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुरू असलेल्या अर्ज चौकशीत मदत करून कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
गुरुवारी (ता. १४) तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर शुक्रवारी पिंपळगाव (बसवंत) पोलिस ठाण्यात सापळा रचण्यात आला. यावेळी संतोष ब्राह्मणे यांनी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
पोलिस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात हवालदार गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके तसेच विनोद पवार आदींचा सहभाग होता. पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी तपास करीत आहेत.
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.