एन्कर
लोगो : स्वागत गणरायाचे
--
फोटो : A14664
नाशिक : गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणेशमूर्ती बुकिंग करण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी
--
मंडप उभारणीसह बाजारपेठेत खरेदीची लगबग
गणरायाच्या स्वागतासाठी नाशिकनगरी सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरात गणेशोत्सवाची लगबग मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील विविध भागांत मंडप उभारणी, आकर्षक विद्युत रोषणाई, स्वागत कमानी आणि कलात्मक आरास उभारण्याच्या कामांना जोरदार वेग आला आहे.
सोमवारी (ता. १४) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत असून, उत्सवासाठी विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित देखावे आणि सजावट उभारण्याचे नियोजन केले जात आहे. शहरातील चौकाचौकांत मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू असून, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते सजावटीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, घरगुती गणेशोत्सवासाठीही नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मनपसंत गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी करण्यासाठी नागरिक मूर्तिकारांच्या दुकानांवर व कार्यशाळांमध्ये गर्दी करत आहेत. वेगवेगळ्या आकारांतील, विविध रूपांतील आणि आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये उपलब्ध असून, नागरिक आपल्या आवडीची मूर्ती निवडण्यासाठी फिरताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्येही नवे चैतन्य निर्माण झाले आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे विविध साहित्य, आकर्षक विद्युत माळा तसेच पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणरायाच्या स्वागताच्या या सर्व तयारीमुळे संपूर्ण शहरातील वातावरण भक्तिमय झाले असून, सार्वजनिक मंडळांसह घराघरांत बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता ताणली गेली आहे.
--- चौकट
ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद
लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी महापालिका तसेच पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसोबतच परवानगी मिळवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. प्रशासनातर्फे ऑनलाइन पद्धतीनेही अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात आतापर्यंत २१ सार्वजनिक मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. तसेच, महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने ३६ मंडळांची नोंदणी झाली आहे. येत्या दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.