पत्नीला बेदम मारहाण;
उपचारादरम्यान मृत्यू
पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा; डोक्याला दुखापत, गुदमरल्याने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २२ : घराची चावी सापडत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागाव आणि बजरंगवाडी परिसरात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरीना उर्फ नन्नी अस्लम शेख (वय १९, रा. महादेव मंदिराजवळ, बजरंगवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
संशयित पती इद्रिस मोहम्मद शेख (वय २१) आणि जरीना हे दीड महिन्यापूर्वी बजरंगवाडी येथे भाड्याच्या घरात राहण्यास आले होते. रविवारी (ता. २०) रात्री सव्वादहाच्या सुमारास दोघे रिक्षाने जरीनाच्या वडिलांच्या वडाळागाव येथील निवासस्थानाजवळ आले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी इद्रीसने जरीनाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. यानंतर दोघे बजरंगवाडीतील घरी गेले. रात्री अकराच्या सुमारास जरीनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक त्यांच्या घराजवळ जमा झाले. त्यावेळी इद्रिस जरीनाला हाताने मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसून आले. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती, तर कपाळातून रक्तस्राव होत होता. घराची चावी सापडत नसल्याने दोघांमध्ये वाद झाल्याचे इद्रीसने नागरिकांना सांगितले. नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर त्याने मारहाण थांबविली.
दुसऱ्या दिवशी सकाळी जरीना घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यावेळी तिचा पती घरात नव्हता. शेजारील महिलेने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर जरीनाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी (ता. २१) रात्री डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्रथम या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत झाल्याचे तसेच गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. हवालदार राजू शिंदे यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित पती इद्रिस शेख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, रासायनिक विश्लेषणासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
संशयित पती सराईत गुन्हेगार
इद्रिस मोहम्मद शेख हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.