हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून सात लाखांची खंडणी
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; दोघांना अटक, तिसरा आरोपी निष्पन्न
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. १० : मैत्रिणीसोबत लॉजवर गेलेल्या व्यक्तीला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून, बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण करून सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपासात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे पिंपळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश उत्तमराव वानखेडे (वय ४५, व्यवसाय इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर, रा. ओझर टाउनशिप, ता. निफाड) हे ७ सप्टेंबरला त्यांच्या मैत्रिणीसोबत वडाळीभोई येथील आशीर्वाद लॉजमध्ये गेले होते. लॉजमधून बाहेर पडल्यानंतर काही जणांनी संबंधित महिलेचे भाऊ असल्याचे सांगत वानखेडे यांना अडविले. महिलेवर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांना मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने वाहनात बसवून पिंपळगाव येथे आणले.
तेथे त्यांच्याकडे सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यापैकी तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे वानखेडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यातून हृषीकेश विठ्ठल ठाकरे (रा. पिंपळगाव बसवंत) आणि राहुल युवराज आहिरे (रा. ओझर) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात समाधान आहिरे याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास भोर तपास करीत आहेत.
आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता
हनी ट्रॅपच्या माध्यमातून पिंपळगाव शहरातील काही नामांकित व्यक्तींना यापूर्वीही लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा आहे. अटक केलेल्या संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, या तपासातून आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक, बलात्कार अथवा अन्य खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग, मारहाण किंवा खंडणीची मागणी अशा प्रकारचा अनुभव कोणाला आला असल्यास नागरिकांनी भीती अथवा दबाव न बाळगता तातडीने पिंपळगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोट
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग किंवा खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा गुन्ह्यांमध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.
-गणेश गुरव, पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.