SGR26B07455
सोनगीर : अरूंद पुलवर असा ट्राला अडकल्याने वाहतूक ठप्प झाली.
--------
अरुंद पुलावर ट्राला अडकला
सोनगीर- अमळनेर मार्गावर वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. ४ : मुंबई- आग्रा महामार्गावरील वाघाडी फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी करण्यात आलेली तात्पुरती व्यवस्था वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अपूर्ण सर्व्हिस रस्त्यांसह अरुंद पुलामुळे मोठ्या वाहनांना मार्गक्रमण करणे कठीण होत असून, गुरुवारी (ता. ४) दुपारी साडेचारच्या सुमारास अवजड यंत्रसामग्री घेऊन जाणारा ट्राला अरुंद पुलावर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांचे हाल झाले.
मुंबई- आग्रा महामार्गावर सोनगीरहून अमळनेरकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडताना वारंवार अपघात होत असल्याने वाघाडी फाट्यावर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने सोनगीरच्या बालाजीनगरकडे जाणाऱ्या बोगद्यापासून दोन्ही बाजूंनी सिमेंटचे दोनपदरी सर्व्हिस रस्ते तयार केले. मात्र, हे रस्ते अद्याप पूर्ण झालेले नसतानाच त्यावरून वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हिस रस्त्यावर चढताना आणि उतरताना दोन्ही बाजूंना खडीचा कच्चा रस्ता ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघाताचा धोका वाढला आहे. याच परिसरात यापूर्वी दोन ट्रक आणि एक ट्रॅक्टर उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच एका युवकासह महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येते. वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत.
अमळनेर-सोनगीर बससेवाही ठप्प
वाहतूक व्यवस्थेच्या या गोंधळाचा फटका एसटी बससेवेलाही बसला आहे. अमळनेर- सोनगीर बस वाहतूक पूर्णतः ठप्प होत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोनगीरहून शिरपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावरही अरुंद पूल तयार करण्यात आला आहे. गुरुवारी अवजड यंत्रसामग्री वाहून नेणारा ट्राला या पुलावर अडकल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर वाहतूक खोदून ठेवलेल्या मुख्य मार्गावर तसेच विरुद्ध बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरून वळविण्यात आली. परिणामी दोन्ही दिशेची वाहने एकाच सर्व्हिस रस्त्यावरून मार्गक्रमण करू लागल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.