पाताळेश्वर चौकात
तरुणास मारहाण
शिरपूर : शहरातील पाताळेश्वर चौकात तरुणाला मारहाण केल्यावरून तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीची घटना ८ सप्टेंबरला रात्री साडेदहाला घडली होती. जखमी समीर शहा फिरोज शहा (वय २१, रा. मच्छी बाजार, शिरपूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरव नरेंद्र बोरसे, आकाश महेंद्र बोरसे व दिक्षू संतोष थोरात (सर्व रा. खालचे गाव बौद्धवाडा, शिरपूर) यांनी त्याला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी व लोखंडी कड्याने मारहाण केली. हवालदार चेतन सोनवणे तपास करीत आहेत.
आढे येथे
दोघांना मारहाण
शिरपूर : आपसातील भांडणाबाबत पोलिसांत तक्रार दिल्यावरून दोघांना मारहाण केल्यावरून सहा जणांविरोधात थाळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीची घटना १२ सप्टेंबरला रात्री अकराला नवे आढे (ता. शिरपूर) येथे घडली. विलास भीमराव शिरसाट (वय ३८, रा. नवे आढे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित स्वप्नील शिरसाट, राज शिरसाट, राजेंद्र शिरसाट, आशाबाई शिरसाट (सर्व रा. नवे आढे), नाना बैसाणे व जितेंद्र बैसाणे (दोघे रा. मेथी, ता. शिंदखेडा) यांनी दगडाने डोक्यावर मारून दुखापत केली. कैलास शिरसाट भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. हवालदार भूषण चौधरी तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीची प्रसूती,
पाच जणांवर गुन्हा
शिरपूर : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर पतीपासून तिला दिवस गेले. प्रसूतीनंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र, त्याच वेळी ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तालुका पोलिस ठाण्यात तिचा पती, सासू, सासरा यांच्यासह लग्न लावून देणारे आई-वडील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक मनोज कचरे तपास करीत आहेत.
पळवून नेत युवकाला
मारहाण, चौघांवर गुन्हा
शिरपूर : मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करीत शेतात फेकून दिल्यावरून चौघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ९ सप्टेंबरला सकाळी दहाला बोराडी (ता. शिरपूर) येथील सतीमाता मंदिराजवळ घडली. उमेश गुलाब पाटील (वय २४, रा. बलकुवे, ता. शिरपूर) याने सांगवी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मैत्रिणीला भेटण्यासाठी बोराडी येथे गेला होता. संशयितांनी त्याचे डोळे व तोंड बांधून चारचाकी वाहनात बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला जंगलात नेऊन काठी व चाकूने वार करून जखमी केले. अनरद (ता. शहादा) येथील शेतात त्याला फेकून संशयित फरारी झाले. उमेश पाटील याच्या फिर्यादीवरून संशयित सागर पाटील (रा. लौकी, ता. शिरपूर), सागरच्या मावशीचा मुलगा, मनोज तथा बापू शालिक पाटील (रा. अर्थे, ता. शिरपूर) व सागरचा मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.
वनावल येथे
एकाची आत्महत्या
शिरपूर : वनावल (ता. शिरपूर) येथील वेडू मंगा भिल (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष धनगर यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावलेला वेडू भिल याचा मृतदेह १४ सप्टेंबरला सकाळी आढळला. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार ईशी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.