शेतमालाचा परतावा रखडला
भारतीय किसान संघातर्फे कारवाईची मागणी
शिरपूर, ता. १८ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे तीन ते चार महिन्यांपासून रखडल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघाच्या माध्यमातून केली. शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारावर बाजार समितीचे प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप करून संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
शेतकरी हिरेंद्र राजपूत, जितेंद्र राजपूत व अशोक पाटील यांनी येथील सहकारी संस्थांच्या सहायक निबंधकांना शुक्रवारी (ता. १८) निवेदन दिले. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे काही व्यापाऱ्यांकडून तीन ते चार महिन्यांपासून मिळालेले नसल्याचे नमूद करीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बाजार समितीअंतर्गत परवानाधारक व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रत्यक्ष शेतमाल खरेदीच्या वेळी मोजकेच व्यापारी उपस्थित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. जे व्यापारी शेतमाल खरेदीसाठी बोली लावत नाहीत, खरेदी करीत नाहीत, त्यांचे परवाने तत्काळ रद्द करून बाजार समितीने त्यांना दिलेल्या जागा रिक्त करून घ्याव्यात अशी मागणी निवेदनातून केली आहे.
वजनकाट्यावरील पावती व तकपट्टी यामधील वजनात तफावत आढळून येत असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले, त्याची खरेदी २९ मेपासूनच बंद केल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. बंदी असतानाही संबंधित व्यापाऱ्याने जूनमध्ये लिलावासह बोली लावण्यात सहभाग कसा घेतला, त्याला रोखण्यासाठी काहीच पावले का उचलली नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.