नोकरीच्या आमिषाने फसविणाऱ्यास
आठ महिन्यांचा सश्रम कारावास
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. २५ (सकाळ वृत्तसेवा) : शैक्षणिक संस्थेत शिक्षक व शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या यशवंत मोहन राऊत (रा. मोठामळा, ता. सुरगाणा) यास सटाणा न्यायालयाने आठ महिन्यांच्या सश्रम कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बोरगाव (ता. सुरगाणा) येथील एका शैक्षणिक संस्थेत २०१९ मध्ये शिक्षक व शिपाई पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत राऊत याने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम घेतली होती. फिर्यादी व साक्षीदार हे अशिक्षित व कष्टकरी कुटुंबातील असल्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या अपेक्षेने त्यांनी पशुधन विकून तसेच उसनवारी करून पैसे उभे केले होते.
दीर्घकाळ उलटूनही नोकरीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने फिर्यादींनी राऊत याच्याकडे वारंवार विचारणा केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, तर नंतर पैसे मागणाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने फिर्यादींनी सटाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी खटल्याचा पाठपुरावा केला.
खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे ॲड. सागर गायकवाड यांनी युक्तिवाद केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. यू. शिफकुले यांनी उपलब्ध पुरावे व साक्षी ग्राह्य धरून यशवंत मोहन राऊत यास फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. न्यायालयाने त्यास आठ महिन्यांच्या सश्रम कारावासाची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. सागर गायकवाड, ॲड. अतुल महाजन व ॲड. विनायक आहेर यांनी कामकाज पाहिले. त्यांना बी. पी. चव्हाण व पैरवी अधिकारी दत्ता आहेर यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.