YEO26B25306
येवला : व्यापारी संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या पाणी उपस्याची पाहणी करताना शिवसेनेचे कार्यकर्ते.
------------
भरवस्तीमध्ये पाण्याची नासाडी
येवल्यात शिवसेनेकडून उपसा थांबवण्याची मागणी
-----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १५ : जुन्या नगरपालिकेच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्यासाठी खोलवर खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी येत असून येथे दिवस- रात्र पाण्याचा उपसा सुरू आहे. जमिनीतील पाण्याचा उपसा करून हे पाणी सांडपाण्याच्या गटारीत सोडणे चुकीचे आहे. एकीकडे पाणी नाही म्हणून शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करायचा आणि दुसरीकडे अशा पद्धतीने पाणी वाया घालवणे चुकीचे आहे.त्यामुळे ही पाण्याची नासाडी तत्काळ थांबवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जुन्या नगरपालिका परिसरात सध्या भव्य वाणिज्य संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, या बांधकामासाठी भूगर्भातील पाण्याचा व मोटारींचा वारेमाप उपसा करून ते पाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, कासम शेख, वाहप शेख, धीरज खंदारे, अझहर शेख, अमीर अन्सारी, तहसीब शेख, सद्दाम शहा आदी पदाधिकाऱ्यानी प्रत्यक्ष पाहणी करत संताप व्यक्त केला.
शहराला सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, प्रशासनाकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही, वाणिज्य संकुलाच्या ठिकाणी २-३ मोटारी लावून पाणी रस्त्यावर वाहू दिले जात आहे. विशेष म्हणजे, हे पाणी १ ते १.५ किमी अंतरावरील गंगासागर तलावातून पाझरणारे असून,तलावातील पाण्याचा यामुळे उपसा होत आहे. त्याचा थेट परिणाम साठवण तलावातील पाणी कमी होण्यावर होत आहे. अशा प्रकारे नैसर्गिक स्त्रोताची नासाडी होणे गंभीर असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. शहराची टंचाई दूर होईपर्यंत नगरपालिकेने हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.