26728
येवला : एसटीच्या एनसीएमसी कार्ड बाबत मंत्री छगन भुजबळांकडे गाऱ्हाणे मांडताना समाजसेवक प्रभाकर झळके.
व्यंगचित्रकार झळकेची तक्रार
अन भुजबळांचा परिवहन मंत्र्यांना फोन
सकाळ वृत्तसेवा
येवला,ता. १५ : बोटांचे ठसे जुळत नसल्याने एनसीएमसी कार्ड मिळविण्यात अडथळे आणि कार्डाअभावी सवलतीच्या प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ...अशा दुहेरी कात्रीत ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत. या गंभीर समस्येकडे येथील ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले. भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे हा प्रश्न मांडल्यानंतर, समस्येची दखल घेऊन तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन सरनाईक यांनी दिले.
राज्यातील एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, कार्ड काढताना बायोमेट्रिक प्रणालीमध्ये बोटांचे ठसे न जुळणे तसेच विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना कार्ड केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
हीच व्यथा ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडली. ज्येष्ठ नागरिकांना केवळ तांत्रिक अडचणीमुळे सवलतीपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींची माहिती दिली. मंत्री सरनाईक यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.