नाशिक

६-- दिवाळी अंक ---तोरणमाळ ...सातपुड्याच्या कुशीत विसावलेलं निसर्गाचं हळवं स्वप्न

CD
दुर्ग पर्यटन २१ वा लेख फोटो : (रणजित राजपूत पासपोर्ट) फोटो : NSK26H33074 (तोरणमाळचा यशवंत तलाव) फोटो : NSK26H33073 (हिरवळीने बहरलेलेे तोरणमाळचे डोंगर) फोटो : NSK26H33072 (तोरणमाळच्य सौंदर्यात भर घालणारी कमळाची फुले) फोटो NSK26H33071 (पर्यटकांना मोहिनी घालणारी सीताखाई ) ------------ तोरणमाळची बखर! सातपुड्याच्या कुशीत विसावलेले निसर्गाचे हळवे स्वप्न बोचऱ्या थंडीच्या दिवसांत गवताच्या पात्यांवरचे दवबिंदू गोठतात, तेव्हा तोरणमाळ देशभर चर्चेत येते. पण तोरणमाळचे खरे सौंदर्य त्या गोठलेल्या दवबिंदूंमध्ये नसून धुक्यात हरवलेल्या पाऊलवाटांत, दऱ्याखोऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याच्या सुरांत, शतकानुशतके लोकस्मृतीत जपलेल्या आख्यायिकांत आणि जंगलाला आपले सर्वस्व मानून जगणाऱ्या आदिवासींच्या संस्कृतीत आहे. या अद्वितीय निसर्गशिल्पाविषयी... - रणजितसिंह राजपूत, नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगांत समुद्रसपाटीपासून सुमारे १,१५० मीटर उंचीवर वसलेलं हे पठार महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. मोठ्या शहरांपासून आणि गजबजलेल्या महामार्गांपासून तोरणमाळ काहीसे अलिप्त राहिले. दळणवळणाच्या मर्यादा आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती यामुळे पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात त्याला अपेक्षित स्थान मिळाले नाही. पण या अलिप्ततेने तोरणमाळला एक अनमोल देणगी दिली. त्याचे मूळ सौंदर्य बऱ्याच अंशी टिकून राहिले. घाटवळणांचे रस्ते, बाजूला हिरवीगार झाडी, गवताचा मखमली गालिचा पांघरलेले डोंगर, त्यांच्या अंगाखांद्यावर विसावलेली वनराई, आकाशाला भिडू पाहणाऱ्या पर्वतरांगांतून खळखळणारे झरे आणि क्षितिजाचा ठाव घेऊ पाहणाऱ्या पाऊलवाटा! या साऱ्यांना आपल्या आसमंतात कवटाळून तोरणमाळ अजूनही जगाच्या गजबजाटापासून दूर आहे. पण तोरणमाळची खरी ओळख केवळ या निसर्गात नाही. ती आहे त्याच्या इतिहासात आणि लोकस्मृतीत! तोरणमाळ या नावाभोवतीच कितीतरी कथा गुंफल्या गेल्या आहेत. पुराणपरंपरेत ''तूर्णमाळ'' असा उल्लेख आढळत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात तोरणाची झाडे मुबलक प्रमाणात असल्याने तोरणमाळ हे नाव पडले असावे, अशी एक व्युत्पत्ती आहे. स्थानिक आदिवासींच्या श्रद्धेत तोरणादेवीचे स्थान महत्त्वाचे आहे. सातपुड्याच्या डोंगरी प्रदेशाचं प्रवेशद्वार अथवा तोरण म्हणूनही या नावाकडे पाहिले जाते. अशा काही आख्यायिका... महाभारतकाळात तोरणमाळ येथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता, अशी लोकपरंपरा आहे. खानदेशचा मोठा प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली होता आणि तोरणमाळ ही त्याच्या साम्राज्याची राजधानी होती, असे सांगितले जाते. या राजाच्या कथेला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या भामेर किल्ल्याशीही विलक्षण धागा जोडलेला आहे. भामेरच्या लोककथेनुसार, पावसाळ्यात तोरणमाळच्या डोंगरांवर मुसळधार पाऊस पडत असे. घाटवाटा निसरड्या होत. दळणवळण खंडित होत असे. तेव्हा युवनाश्व राजा भामेरच्या किल्ल्यात वास्तव्य करीत असे. तोरणमाळच्या तुलनेत कमी पावसाच्या प्रदेशात असलेला भामेर त्याच्या वास्तव्यासाठी अधिक सोयीचा असावा. आज तोरणमाळ आणि भामेरच्या अंतराकडे पाहिले, की या कथेत दडलेले भौगोलिक वास्तव लक्ष वेधून घेते. जुन्या काळच्या राजवटी, घाटवाटा आणि डोंगरी किल्ल्यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी या आख्यायिका महत्त्वाचे धागे ठरू शकतात. भामेरची आणखी एक लोककथा अधिक रंजक आहे. पांडवांनी अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला घोडा युवनाश्व राजाने अडवला आणि भामेर उर्फ भम्बागिरीच्या किल्ल्यात लपवून ठेवला. पांडवांनी युवनाश्वाशी युद्ध करून त्याचा पराभव केला आणि घोडा सोडवून नेला. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. कुरुक्षेत्राच्या युद्धात युवनाश्व पांडवांच्या बाजूने लढला, अशीही आख्यायिका सांगितली जाते. अश्वत्थामा आणि नाथपंथ परंपरा तोरणमाळच्या किल्ल्याशी अश्वत्थाम्याच्या वास्तव्याची श्रद्धाही जोडली जाते. महाभारतातील चिरंजीव अश्वत्थामा या डोंगरांमध्ये वावरत असल्याची भावना काही स्थानिक आदिवासींमध्ये आहे. या श्रद्धेभोवती गुंफलेल्या गोष्टी तोरणमाळच्या गूढ सौंदर्यात आणखी भर घालतात. तोरणमाळच्या इतिहासाला नाथपंथाच्या परंपरेने आध्यात्मिक परिमाणही दिले आहे. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्या तपश्चर्येशी या भूमीचं नाव श्रद्धेने जोडले गेले आहे. गोरक्षनाथ मंदिर आणि मच्छिंद्रनाथांची गुंफा ही या परंपरेची जपलेली स्थाने आहेत. डोंगरमाथ्यावरचे नीरव वातावरण, सभोवतालची वनराई आणि लोकमनातील श्रद्धा यामुळे येथे अध्यात्म आणि निसर्ग यांचे अद्भुत नातं अनुभवायला मिळते. दरवर्षी महाशिवरात्रीला गोरक्षनाथांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील भाविक या डोंगरमाथ्यावर एकत्र येतात. वर्षभर शांत असलेल्या परिसराला यात्रेच्या दिवसांत वेगळीच जाग येते. आदिवासी संस्कृती, लोकश्रद्धा आणि भक्तिभावाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. यशवंत तलावाच्या उत्पत्तीबाबतही एक हृदयस्पर्शी आख्यायिका सांगितली जाते. एकदा या परिसरात भीषण दुष्काळ पडला. पाण्यावाचून माणसं आणि प्राणी व्याकूळ झाले. तेव्हा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्येच्या सामर्थ्याने नर्मदा मातेला पाचारण केले. नर्मदा मातेने पाणी देण्याचे मान्य केले. मात्र, गरजेपेक्षा जास्त पाणी आल्यास ते परत करण्याची अट घातली. या दिव्य घटनेतून तलावाची निर्मिती झाली, अशी लोकश्रद्धा आहे. तलावाच्या तळाशी एक प्राचीन मंदिर असल्याचंही सांगितले जाते. चौदा खाटांच्या विणकामाला पुरेल एवढा दोर तलावाची खोली मोजण्यासाठी पाण्यात सोडला, तरी तळ सापडला नाही, अशी आख्यायिका आहे. या तलावातून बाहेर पडणारे पाणी सीताखाईच्या परिसरातून पुढे नदीप्रवाहांना मिळते. नर्मदेच्या खोऱ्याशी जोडलेल्या या जलप्रवाहांनी सातपुड्याच्या भूगोलाला वेगळेच महत्त्व दिले आहे. यशवंत तलाव! पहिल्यांदा तोरणमाळला पोहोचल्यावर नजरेत भरतो तो दूरवर पसरलेला हा निळाशार जलाशय. सभोवताली हिरव्यागार झाडांची गर्दी. दूरवर डोंगरांच्या रांगा. आभाळात तरंगणाऱ्या ढगांची प्रतिबिंबं पाण्यावर उमटलेली. आणि या साऱ्यांच्या मध्यभागी एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखा शांत विसावलेला यशवंत तलाव! महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तोरणमाळला भेट दिली होती. त्यांच्या भेटीनंतर २६ सप्टेंबर १९६९ रोजी या तलावाचं ''यशवंत तलाव'' असे नामकरण झाल्याचा उल्लेख आढळतो. सुमारे १.५९ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या तलावात तोरणमाळचे अवघे सौंदर्य सामावले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागानेही या तलावाच्या निसर्गरम्य परिसराची आणि नौकानयनाच्या अनुभवाची विशेष नोंद घेतली आहे. सीताखाई तोरणमाळचे आणखी एक थक्क करणारे सौंदर्य म्हणजे सिताखाई! तीन बाजूंनी खोल फाटलेला पहाड. मध्येच उभा राहिलेला उंच सुळका. भोवताली गर्द झाडी. खाली नजरेचा ठाव न लागणारी दरी. आणि पावसाळ्यात त्या कड्यावरून मुक्तपणे कोसळणारा धबधबा. सीताखाई म्हणजे निसर्गाच्या अचाट सामर्थ्याने साकारलेलं एक जिवंत शिल्पच. या परिसराला रामायणातील सीतेच्या कथेशी जोडणाऱ्या लोकश्रद्धाही आहेत. म्हणूनच निसर्गाच्या या भव्य रचनेला पौराणिक भावविश्वाचीही एक गूढ किनार लाभली आहे. सिताखाईच्या परिसरातले कमळतलाव हे निसर्गाचे एक कोमल रूप आहे. खडकी आणि आमदरीच्या परिसरातून दिसणारी सातपुड्याची विस्तीर्ण पर्वतरांग मनाला वेगळेच समाधान देते. नागार्जुन पॉइंट आणि सातपुडा व्ह्यू पॉइंटसारखी ठिकाणंही या प्रदेशाचं विराट दर्शन घडवतात. तोरणमाळच्या वाटेवरचा सातपायरी घाट हा तर मानवी कौशल्य आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम आहे. एका उंच टोकावरून खाली पाहिले, की एकाखाली एक असे नागमोडी वळणांचे सात पदर नजरेत भरतात. याच परिसरातील प्राचीन जैन लेणे तोरणमाळच्या सांस्कृतिक वैभवाची आणखी एक साक्ष आहे. खडकात कोरलेले प्रवेशद्वार, नक्षीकामाची ललाटपट्टी आणि पार्श्वनाथांची मूर्ती या प्रदेशातील जुन्या धार्मिक परंपरांची आठवण करून देतात. तोरणमाळच्या जंगलांचेही स्वतंत्र विश्व आहे. इथल्या वृक्षसंपदेने, पक्ष्यांनी आणि वन्यजीवांनी या पर्वताला समृद्ध केले आहे. पहाटेच्या वेळेस ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज, झाडांच्या पानांतून वाहणारा वारा आणि जंगलातली गूढ शांतता यांचे एक वेगळेच संगीत तयार होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून यापूर्वीच तोरणमाळ येथे पर्यटक निवासाची व्यवस्था उभी राहिली आहे. खासगी निवासव्यवस्था, वनविभागाचं विश्रामगृह, निवडक ठिकाणी उपलब्ध असलेल्या भोजन आणि मुक्कामाच्या सुविधा यामुळे या डोंगरमाथ्यावर रात्र घालवण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. वनविभागाच्या विश्रामगृहात खोल्या, कॉटेज, सामूहिक निवास आणि मूलभूत सुविधांची माहितीही पर्यटन सेवा पुरवठादारांकडून उपलब्ध होते. मात्र, हंगामात निवासाची उपलब्धता आगाऊ तपासणे आवश्यक ठरते. जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर पर्यटकांना राहण्याची सोय मिळावी, यासाठी ''होम स्टे'' पद्धतीचे प्रारूप तयार होत असल्याची माहिती दिली. या सुविधा नियोजनाच्या टप्प्यात असल्या, तरी तोरणमाळच्या भविष्यातील पर्यटनविकासासाठी ही महत्त्वाची दिशा आहे. (लेखक माहिती व जनसंपर्क विभागात वरिष्ठ अधिकारी आहेत )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Class 10 Syllabus Change: 'सीबीएसई'च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल! दहावीच्या अभ्यासक्रमातून 'पर्यावरण शिक्षण' विषय वगळला, व्यावसायिक शिक्षण अनिवार्य

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

ChatGPTचा सल्ला ठरला जीवघेणा! ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू; एआयवर विश्वास ठेवणे ठरतेय धोकादायक

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT