बातमीमागची बातमी--लोगो
------
मुलीसाठी वरसंशोधनाचे स्वप्न क्षणार्धात उध्वस्त
मातापित्यांसह मुलीच्या मृत्यून तिसगाव ढंढाणे पंचक्रोशीवर शोककळा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता.२९ : मुलीच्या आयुष्यातील नव्या पर्वाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन भावी वराला पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. मुलीच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या आई-वडिलांसह मुलीचाही भीषण अपघातात अंत झाला. टिंगरीजवळील वनपट फाटा परिसरात बुधवारी (ता.२९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिसगाव- ढंढाणे (ता.धुळे) येथील राजू माने, त्यांची पत्नी बालाबाई आणि मुलगी भटाबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिसगावसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
राजू माने हे पत्नी बालाबाई आणि मुलगी भटाबाईसह नांदगाव येथे मुलीसाठी वर पाहण्यासाठी गेले होते. तेथून दहिदीमार्गे कुसुंबा येथे परत येत असताना टिंगरी शिवारातील वनपट फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. धडक देणाऱ्या पिकअपचा चालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या माने कुटुंबाच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या धडकेची तीव्रता इतकी होती की, क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका कुटुंबाची स्वप्ने, आनंद आणि भविष्याची आशा एका दुर्दैवी घटनेने हिरावून घेतली. मुलीच्या आयुष्यात सुखाचा नवा अध्याय सुरू व्हावा यासाठी तिच्या संसाराची स्वप्ने आई- वडिलांनी पाहिली, मात्र ते क्षणार्धात उध्वस्त झाले. या घटनेमुळे माने कुटुंबीयांच्या नातेवाइकांवर आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघाताची माहिती सोशल मीडियातून नातेवाईकांना समजली. त्यानंतर त्यांनी तिसगाव-ढंढाणे येथे कळविले. घटनेचे वृत्त समजताच ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवारातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. गावातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.